रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड खंडाळा येथील तिहेरी खून प्रकरणात जयगड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सोनावणे यांना तपासात हलगर्जी केल्याने निलंबित करण्यात आले आहे. तसेच पोलीस हवालदार गमरेची खातेनिहाय चौकशी सुरु असून त्याच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खंडाळा रत्नागिरी येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. या खून प्रकरणामुळे जयगड पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले होते. या प्रकरणातील राकेश जंगम बेपत्ता झाल्याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी जयगड पोलीस ठाण्यात खबर दिली होती. या प्रकरणात जयगड पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे एक वर्ष उलटूनही त्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही.
भक्ती मयेकरच्या खुनातील संशयित आरोपी दुर्वास पाटील आणि त्याच्या साथिदारांची चौकशी करताना राकेश जंगमचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. राकेशचा मृतदेह आंबा घाटात टाकून देण्यात आला होता. परंतू एक वर्ष उलटून गेल्यामुळे त्याचा मृतदेह मिळू शकला नाही.
दरम्यान, राकेश जंगम बेपत्ता झाल्यानंतर जयगड पोलिसांनी त्याचा शोध घेण्यात केलेल्या हलगर्जीपणामुळे दुर्वास पाटील आणि त्याच्या साथिदारांनी राकेशचा खून पचवून पुढे भक्ती मयेकरचाही खून पचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी भक्ती तिचाही मृतदेह आंबा घाटात फेकून दिला होता. परंतू भक्ती मयेकरच्या खूनाला वाचा फूटल्यामुळे राकेश जंगमचाही एक वर्षापूर्वी खून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
याप्रकरणी दोषी जयगड पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी दिले होते. त्यानंतर अपर पोलीस अधिक्षक बी.बी.महामूनी यांनी राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, पोलीस हवालदार सोनावणे आणि गमरे यांनी हलगर्जीपणा केल्याचा अहवाल पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्याकडे सोपवला. त्याची दखल घेत नितीन बगाटे यांनी कुलदीप पाटील यांची तातडीने पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली. तर पोलीस हवालदार सोनावणे यांचे निलंबन केले. तसेच हवालदार गमरे यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली असून त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.