सातारा : वाई अर्बन बँकेवरील रिझर्व्ह बँकेचे निर्बंध शिथिल झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी दिली.बँकेच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यामुळे रिझर्व बँकेने वाई अर्बन बँकेवर निर्बंध लावले होते. मोठ्या मोठ्या रकमेची कर्ज वितरित करण्यावर बंदी होती. यावर्षी बँक नफ्यात आल्यामुळे वसुलीमध्ये सातत्य ठेवल्यामुळे रिझर्व बँकेने वाई अर्बन बँकेवरील निर्बंध शिथिल केल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
१०४ वर्षे सहकारातील जुनी बँक करोनामुळे अडचणीत आली होती. रिझर्व्ह बँकेने कर्ज वाटपावर तसेच मोठ्या प्रमाणात निर्बंध लावले होते. ३१ मार्च २०२५ अखेर बँकेने सहकार खात्याचे विशेष सहकार्यामुळे तसेच थकीत कर्जदारांवर केलेल्या कडक कायदेशीर कारवायांमुळे समाधानकारक वसुली करून थकबाकीचे प्रमाण कमी राखले आहे. बँकेला मागील चार वर्षांत प्रथमच नफा मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या वैधानिक लेखा परीक्षणामध्ये बँकेला ऑडिट वर्ग ब प्राप्त झालेला असून, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीचा विचार होवून रिझर्व्ह बँकेने लावलेले निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल केले आहेत.
रिझर्व बँकेने बँकेच्या व्यवसायावर लावलेले निर्बंध शिथिल केल्यामुळे आता बँक चांगल्या कर्जदारांना आवश्यक कर्ज पुरवठा योग्य व्याजदरात करू शकणार आहे. तसेच ठेवीवर देखील व्याजदरात वाढ करून ठेवीदारांना याचा फायदा होणार आहे. बँकेने नुकतेच वैयक्तिक वापराचे वाहन कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत, गृहकर्जावरील व्याजदर कमी करून तसेच व्यवसायाकरिता मुदत बंद कर्ज (टर्म लोन) माफक व्याजदरात उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच बँक विशेषतः बचत, चालू खात्यावर कोणतेही शुल्क आकारत नाही.
अध्यक्ष अनिल देव यांनी बँकेवरील अडचणीच्या काळात सभासद, ग्राहक, ठेवीदार यांनी विश्वास दाखवला, सर्वांच्या सहकार्यामुळे बँकेवरील निर्बंध शिथिल झालेले आहेत त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. सर्व सभासद, खातेदार, ग्राहक, व्यावसायिक, सर्वांनी बँकेच्या सर्व ठेवी, कर्ज योजनांचा लाभ घेवून बँकेच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी केले आहे. यावेळी बँकेचे सर्व संचालक, सरव्यवस्थापक शेखर कांबळे आदी उपस्थित होते.