अलिबाग- आरसीएफ शाळेच्या व्यवस्थापनाचा सावळा गोंधळ सुरूच आहे. त्यामुळे सतराशे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्य अडचणीत येण्याची चिन्ह दिसत आहे. आरसीएफ प्रशासनाकडून शाळेसाठी नवीन शैक्षणिक संस्थेच्या निवड केली असली तरी जुन्या शैक्षणिक संस्थेनी हस्तांतरण प्रक्रीया पूर्ण केली नसल्याने, गोंधळाची स्थिती कायम आहे.
पुणेच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथे आरसीएफ वसाहतीमध्ये शाळा चालवण्यात येत होती. यासाठी आरसीएफ प्रशासन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्यात एक करार करण्यात आला होता. १९८१ ते २०११ पर्यंत हा करार अस्तित्वात होता. नंतर दर पाच वर्षांसाठी कराराचे नुतनीकरण करण्यात येत होते. त्यामुळे शाळा नियमित सुरू होती.
मात्र २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून आरसीएफ सोबत कराराचे नुतनीकरण करण्यास डेक्कन एज्यूकेशन सोसायटीने नकार दिला. त्यामुळे शाळेचे भवितव्य अडचणीत आले. हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा न्यायालयाने नविन शैक्षणिक संस्थेची नेमणूक होत नाही तोवर डेक्कन एज्यूकेशन सोसायटी शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले. आता आरसीएफ प्रशासनाने डिएव्ही कॉलेज मॅनिजिंक कमिटी नवी दिल्ली या संस्थेची निवड केली. मात्र डेक्कन एज्यूकेशन सोसायटीकडून हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाचा घोळ सुरुच राहिला आहे.
त्यामुळे १६ जुन पासून राज्यभरातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी आरसीएफची शाळा सुरू होऊ शकलेली नाही. शाळा व्यवस्थापनाच्या गोंधळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भवितव्याबाबतही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली आहे.
कारण शाळेतील सर्व शिक्षक हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कर्मचारी आहेत. त्यांना नवीन संस्था सामावून घेणार अथवा नाही याबाबतही स्पष्टता नाही. डिएव्ही संस्थेने सिबीएससी पॅटर्ननी शाळा चालवण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या ही शाळा एसएससी बोर्डाशी सलग्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्येही संभ्रमाची स्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी सायंकाळी शाळा व्यवस्थापन, कंपनी प्रशासन, शिक्षण विभाग आणि पालक प्रतिनिधींची बैठक घेतली. शाळा बंद ठेवता येणार नाही तातडीने सुरू करा असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. कंपनीने हस्तांतरण प्रक्रीया तातडीने मार्गी लावावी असे निर्देश दिलेत. तर कंपनीकडून डेक्कन एज्यूकेशन सोसायटी हस्तांतरण प्रक्रीयेसाठी सहकार्य करत नसल्याने, शिक्षण विभागाने त्यांचे अधिकार वापरून शाळा हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण करून देण्याची मागणी केली आहे. शिक्षण विभागकडून जोवर हस्तांतरण पूर्ण होत नाही तोवर शाळा डेक्कन एज्यूकेशन सोसायटीचीच असल्याचे सांगतले जात आहे. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थी आणि पालक गोंधळलेल्या स्थितीत आहेत.
शाळा व्यवस्थापनाबाबत गोंधळाची स्थिती कायम आहे. शाळा व्यवस्थापनाचा प्रश्न लवकर सुटायला हवा. दोन शैक्षणिक संस्थाच्या गोंधळात, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ व्हायला नको येवढी माफक अपेक्षा आहे. धनंजय म्हात्रे,
पालक प्रतिनिधी नवीन शैक्षणिक संस्थेकडे शाळा हस्तांतरण होत नाही तोवर शाळा चालवण्याची जबाबदारी डेक्कन एज्यूकेशन सोसायटीचीच आहे. त्यांनी नियमित शाळा सुरू करावी. महारुद्र नाळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, रायगड</p>