अलिबाग : ज्या राज्याने देशाला चांगल्या रस्त्यांचा आदर्श घालून दिला, त्याच राज्यात मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अशी का, असा उद्विग्न सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यामागची कारणेही सांगितली. एकतर कोकणी माणसाला राग येत नाही आणि भावनेच्या आहारी जाऊन सतत त्याच-त्याच पक्षांच्या लोकांना मतदान केले जात असल्याचा हा परिणाम आहे, असे ते म्हणाले.
मनसे युवा सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या कोकण जागरयात्रेची सांगता कोलाड राज ठाकरे यांच्या सभेने झाली. यावेळी ते म्हणाले, की मुंबई पुणे दृतगती महामार्ग बांधल्यावर संपुर्ण देशाला कळले, देशात चांगला रस्ता होऊ शकतो. ज्या महाराष्ट्राने देशाला चांगला रस्त्याच्या आदर्श घालून दिला, त्याच महाराष्ट्रातील मुंबई-गोवा महामार्गाची वर्षांनुवर्षे अवस्था अशी का? रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे का? कोकणी माणसाला राग येत नाही, त्यामुळे ही परिस्थिती असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सारख्या नविन निविदा काढायच्या, नवीन ठेकेदार नेमायचे, टक्केवारी खायची या दृष्टचक्रात महामार्गाचे काम अडकले आहे. रस्ता खराब ठेऊन महामार्गालगत असलेल्या जागा कमी दरात विकत घ्यायच्या, आणि नंतर रस्ता होईल तेव्हा १०० पट दराने विकायच्या, हा यामागचा दृष्ट हेतू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.