पंढरपूर : उजनी धरणातून भीमा अर्थात चंद्रभागा नदीत येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. पुणे जिल्हा आणि उजनी धरण लाभक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आणि धरणात येणारी पाण्याची आवक घटली. त्यामुळे विसर्ग कमी केल्याने येथील पुराचा धोका टळला आहे, असे असले तरी उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. घाटाच्या पायऱ्या बुडाल्या असून नदीकाठच्या सखल भागात पाणी पोहोचले होते.
सीना नदीच्या पुराचा विळखा कमी होतोय ना होतोय तोच पंढरपुरातील चंद्रभागा नदीला पुराचे संकट ओढावणार का, अशी चिंता होती. उजनी धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे उजनी धरणातून सोमवारी सकाळपासून पाण्याचा विसर्ग हळूहळू वाढवला होता. तो १ लाख २५ हजार क्युसेक पाणी सोडण्यापर्यंत पोहोचला. मात्र रात्रीपासून विसर्ग कमी केला. त्याच बरोबरीने वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यात देखील घट झाली. या दोन्ही ठिकाणाहून चंद्रभागा नदीत येणारे पाणी कमी झाले. मात्र प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता.
येथील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत होती. यंदाच्या पावसाळी हंगामात सहाव्यांदा नदी दुथडी भरून वाहत होती. वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली. तसेच लहान मोठे बंधारे देखील पाण्याखाली गेले. नदीच्या घाटाला पाणी लागले होते. त्यात सोमवारी उजनी धरणातून १ लाख २५ आणि वीर धरणातून ७ हजार असा पाण्याचा विसर्ग सकाळपासून नदीत येऊन मिसळत आहे. त्यामुळे नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीची इशारा पातळी ४४३ मीटर आहे. आणि नदीत १ लाख ५ हजार १९९ क्युसेक म्हणजे ४४३.८ मीटर इतके पाणी वाहत होते.
संध्याकाळपासून पाण्याची पातळी कमी होत आहे. तसेच उजनी धरणातून येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. दरम्यान, जिल्हा आणि पाटबंधारे प्रशासनाने पुण्यातून येणारा पाण्याचा विसर्ग, हवामान खात्याचा अंदाज पाहून नदीत पाणी सोडण्याचे अचूक नियोजन केले. त्यामुळे पुराचा धोका टळला आहे. या पूर्वी ऐन आषाढी वारीच्या तोंडावर पुराचे सावट निर्माण झाले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अचूक नियोजन केल्याने पुराचा धोका टळला होता. असे असले तरी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत एरवी कमी आणि साठलेले पाणी असलेली नदी दुथडी भरून वाहत आहे. तसेच भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे.