केंद्र व राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारने इतके घोटाळे केलेत की त्यांना आता जनता माफ करू शकत नाही, पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यापेक्षा जास्त कालावधी यांना पंतप्रधानपदासाठी मिळाला, परंतु तो त्यांनी घोटाळ्यांसाठी वापरला. या घोटाळेबाज काँग्रेस सरकारची आता मतदारांनी सत्तेतून सुट्टी करावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी सोमवारी शेवगाव येथील सभेत केले.
भाजपचे नगरमधील उमेदवार दिलीप गांधी यांची प्रचार सभा शेवगावमधील खंडोबा मंदिर मैदानात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्वर्गातही समाधान वाटेल, असा चमत्कार जनतेने करून दाखवावा, असेही आवाहन करताना त्यांनी उमेदवार गांधी विजयाची ‘हॅटट्रिक’ साधतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना आपले समर्थनच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशात आत्तापर्यंत ३२ पंतप्रधान झाले. मनमोहन सिंग हेही पंतप्रधान आहेत, मात्र त्यांना अधिकार काहीच नाहीत. ते सर्वात कमजोर पंतप्रधान ठरले आहेत अशी टीका करून अडवाणी म्हणाले, की पंतप्रधानपदाची ताकद काय असते हे अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखवून दिली. वाजपेयी यांनी एक महिन्यात भारताची आण्विक ताकद दाखवून दिली, त्यानंतर अमेरिकेने आर्थिक निर्बंध आणले. देशात भूकंप व वादळामुळे मोठे नुकसान झाले, परंतु तरीही आमच्या सरकारने महागाई वाढू दिली नव्हती, वाजपेयी यांना आणखी एक संधी मिळाली असती तर नदीजोड प्रकल्प पूर्ण होऊन शेतक-यांच्या जीवनात चमत्कार घडला असता, आता हा चमत्कार नरेंद्र मोदी करून दाखवतील.
यूपीएचे सरकार असताना आम्ही उत्तराखंड, झारखंड, पूर्वांचल ही तीन राज्ये आरामात निर्माण केली, कोणताही असंतोष निर्माण झाला नाही. परंतु काँग्रेसच्या काळात तेलंगण राज्याच्या निर्मितीने अराजक निर्माण केले. अनेक जणांचे मृत्यू झाले, केवळ भाजपमुळे तेथील परिस्थिती शांत झाली, असेही अडवाणी म्हणाले.
या वेळी दिलीप गांधी, आ. राम शिंदे, आ. अनिल राठोड, श्याम जाजू, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे आदींची भाषणे झाली. आ. शिवाजी कर्डिले, आ. विजय औटी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, जि. प. सभापती हर्षदा काकडे आदी उपस्थित होते. मनसेचे नगर व सोलापूरचे प्रचार प्रमुख दिनेश लव्हाट यांनी सभेत पक्ष प्रवेश केला.

सभेस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, नगण्य गर्दी पाहून नेत्यांची चलबिचल स्पष्ट जाणवत होती. तळपते ऊन व गटबाजीची चर्चा होत होती. अडवाणींचे आगमनही तब्बल तासभर उशिरा झाले. वक्त्यांच्या भाषणातील नरेंद्र मोदी गोपीनाथ मुंडे यांच्या उल्लेखाला श्रोते जोरदार प्रतिसाद देत होते, मात्र मुंडे सभेस अनुपस्थित होते. पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या अडवाणी यांच्या सभेसही मुंडे अनुपस्थित होते, याची आठवण अनेकांना झाली.लालकृष्ण अडवाणी सभेत श्रोत्यांचा उल्लेख वारंवार ‘औरंगाबादवासीय’ करत होते. अखेर श्याम जाजू यांना उठून येथे ‘अहमदनगरवासीय’ आहेत, याची त्यांना आठवण करून द्यावी लागली. अडवाणी यांचे संपलेले भाषण नंतर पुन्हा दोनदा सुरू केले. एकदा भाषण संपवल्यावर पुन्हा त्यांनी आठवण करून काँग्रेस आघाडी सरकारची सुट्टी करण्याचे आवाहन केले तर वंदे मातरम झाल्यानंतर त्यांनी ठाकरे यांच्या संदर्भातील मुद्दा सांगितला.