सातारा : कुसगाव (ता. वाई) येथील खाणपट्ट्यावरून निर्माण झालेला वाद आणि स्थानिकांच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकारी यांनी मोर्चेकरांचे म्हणणे विचारात घेण्यासाठी कळविल्याने कुसगाव आणि नागेवाडी येथील खाणपट्ट्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि भाजप सातारा जिल्हा महिला युवा मोर्चाच्या अध्यक्षा सुरभी भोसले, प्रशासकीय अधिकारी, तक्रारदार उपस्थित होते.
याबाबत तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्याबाबत सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना आदेश देण्यात आले आहेत, तर नागेवाडी येथील खाणपट्टा हा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘आयटी पार्क’साठी मागितल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.
कुसगाव (ता. वाई) येथे २०२२ साली मंजूर झालेल्या या खाणपट्ट्याला वर्षाला तीन हजार ब्रास उत्खननाची परवानगी आहे. हा खाणपट्टा बंद करावा म्हणून येथील काही ग्रामस्थांनी कुसगाव ते मुंबई मंत्रालय असा पायी मोर्चा काढला आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, की जानेवारी २०२४ मध्ये या खाणपट्ट्याबाबत तक्रारी आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्थळपाहणी केली होती. डिसेंबरमध्ये सर्व संबंधित विभागांनी अभिप्राय दिला आहे. त्या वेळी तक्रारी निकाली काढण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले होते. तसेच, पुन्हा एकदा तक्रार आल्यानंतर आंदोलकांना कळवण्यात आले होते, की तक्रारी निकाली काढल्याने आंदोलन करू नये. मात्र, आंदोलकांनी क्रशर बंद करण्याची मागणी लावून धरली आहे व लाँग मार्च काढला.
याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी २६ जुलै रोजी नवीन खाणपट्ट्याची स्थळपाहणी केली. याव्यतिरिक्त, तक्रारदारांनी नव्याने पाच मुद्दे समोर आणले आहेत. याबाबतही चौकशी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले. गंभीर आक्षेपांमुळे आणि सततच्या तक्रारींमुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.