आगामी पावसाळ्यात पूराचे नियोजन करताना महसूल, पोलीस , जलसंपदा यांसह सर्वच विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा, नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी आज दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी आज(बुधवार) संभाव्य पूर नियंत्रणासाठी केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सचिव विलास राजपूत, सहसचिव तथा मुख्य अभियंता अतुल कपोले आदी उपस्थित होते.

धरणाच्या जलाशयात येणारे पाणी आणि केला जाणाऱ्या विसर्गावर लक्ष ठेवा –

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी धरणाच्या जलाशयात येणारे पाणी आणि केला जाणारा विसर्ग यावर सातत्याने लक्ष ठेवून राहायला हवे. धरणातून पाणी किती सोडण्यात येणार आहे याबाबतची माहिती सतत विविध विभागांना द्यायला हवी. कमी कालावधीत जास्त पाऊस झाला आणि अचानकपणे धरणातून जास्त पाणी सोडण्याची आवश्यकता भासल्यास त्याची पुरेशी माहिती दिली जावी. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठीचे नियोजन करुन ठेवायला हवे असे सांगितले. वारंवार पूर येणाऱ्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ज्या जिल्ह्यात आंतरराज्य मुद्दे आहेत तिथे त्या – त्या राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात रहावे, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी दिल्या.

नदी-नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण करावे-

तसेच, विदर्भात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे या भागात मोठ्या प्रमाणात पूर येतो. हा पूर नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व पर्याय अंमलात आणावे. नदी-नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण करावे, शेजारच्या राज्यांशी संपर्कात राहून तिथल्या धरणाच्या पाण्याच्या नियोजनावर लक्ष ठेवावे असेही जयंत पाटील यांनी सुचित केले.

कर्नाटकच्या जलसंपदा मंत्र्यांशी अलमट्टी धरणाबाबत चर्चा करणार –

पश्चिम महाराष्ट्रातील पूर्ण पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अलमट्टी धरणाच्या पाण्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागते. त्याअनुषंगाने या विषयी आपण कर्नाटक राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच पूर नियंत्रणासाठी सांगली जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून पावसाचा अंदाज पाहून खबरदारीचे पावले उचलली जातील असेही जयंत पाटील यांनी आश्वस्त केले.

याचबरोबर, मागील वर्षी कोयना भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडल्या होत्या. यंदा भूस्खलनाच्या घटना घडू नये याची दक्षता घ्यावी असेही जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

बैठकीला गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना, गोंदिया जिल्हाधिकारी नयना गुंडे, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review meeting held by jayant patil on the backdrop of monsoon instructions for flood control msr
First published on: 01-06-2022 at 19:35 IST