लक्ष्मण राऊत, लोकसत्ता

जालना : जालना लोकसभा मतदारसंघात प्रारंभी विकास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, धोक्यात आलेले संविधान, शेतमालाचे भाव इत्यादी अनेक राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरून सुरू झालेल्या सत्ताधारी तसेच विरोधकांकडून झालेल्या प्रचारास अंतिम टप्प्यात प्रमुख उमेदवारांवरील वैयक्तिक टीकेचे स्वरूप आले होते. प्रमुख दोन उमेदवारांपैकी काँग्रेसचे कल्याण काळे यांची उमेदवारी भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या तुलनेत चार आठवडे उशिरा सुरू झाली. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचारासाठी त्यांना दानवे यांच्यापेक्षा कमी वेळ मिळाला. परंतु वेळ कमी असला तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील प्रमुख नेत्यांची मोट बांधून त्यांनी प्रचारात तसेच दानवे यांच्या विरोधातील पुढाऱ्यांच्या भेटी-गाठी घेण्यात गती घेतली होती.

हेही वाचा >>> कौल जनमताचा : मराठवाड्याच्या मनात काय?

प्रचाराच्या प्रारंभीच रावसाहेब दानवे यांनी आपण कुणावर वैयक्तिक आरोप किंवा टीका करणार नाही आणि विकासकामे तसेच नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व यासह अन्य काही मुद्द्यांवर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. विरोधी उमेदवारावर आरोप करण्याऐवजी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील केलेल्या टीकेला उत्तर देऊन त्यांनी प्रचारास सुरुवात केली होती. अनुच्छेद ३७०, देशाची सुरक्षितता आणि मोदींनी जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न, महाविकास आघाडीतील नेतृत्वाचा गोंधळ, काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या घटनादुरुस्त्या, केंद्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी गेल्या ४०-४५ वर्षांत झालेल्या प्रयत्नांचा इतिहास त्याचबरोबर जालना लोकसभा मतदारसंघातील विकासकामांची मोठी जंत्रीच दानवे यांच्या प्रचारात भाषणांत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस उमेदवार कल्याण काळे प्रारंभीच्या काळात महागाई, बेरोजगारी, विविध समाजघटकांची सुरक्षितता, शेतीमालाचे भाव इत्यादी मुद्दे घेऊन प्रचारात उतरले होते. परंतु शेवटच्या टप्प्यात मात्र त्यांच्या प्रचारात दानवेंच्या विरोधात वैयक्तिक टीकेचे स्वरूप आले होते. जालना जिल्ह्यातील आंतरवाली गाव मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू असल्याने हा मुद्दाही निवडणुकीतील प्रचारात अप्रत्यक्षरीत्या होता आणि कार्यकर्त्यांत त्याचा रोख भाजपच्या विरोधात होता. दानवे यांच्या प्रचारात विविध समाजघटकांना बरोबर घेऊन विकासाकडे वाटचाल करण्याचाच मुद्दा व्यासपीठावरील भाषणात होता. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा मात्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष याला छेद देणारी होती. शेवटच्या टप्प्यात वैयक्तिक स्वरूपात झालेल्या टीकेचा अपवाद वगळता ही निवडणूक फारशी प्रचाराची पातळी सोडून झाली नाही.