करोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांच्या मदतीसाठी जिल्ह्यात टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडने बनवलेला आधुनिक मेडी-रोवर रोबोट उद्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तयार झालेला हा रोबोट जिल्हा आरोग्य यंत्रणेला सुपूर्द केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले की, करोना रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी हा रोबोट मदत करणार असून भविष्यात यामध्ये काही सुधारणा करून नमुने तपासणीसाठी मदत करता येणार आहे.

करोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकच करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यातच आता मेडी-रोवर नामक रोबो कोरोना रुग्णांची‌ सुश्रुषा करण्यासाठी मदत करणार आहे. मेडी-रोवर रोबोटचा प्रमुख उद्देश रुग्ण आणि मेडिकल यांचा कमीत कमी संपर्क यावा हा आहे.

टाटा टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनीष कुमार, यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण व त्यांच्या चमूने मेडी-रोवर हा रोबोट चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीआयआयटी या प्रयोग शाळेत तयार केला आहे. यासाठी विशेष मार्गदर्शन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी दिले होते.

मेडी-रोवरची वैशिष्ट्ये

हा रोबोट वायरलेस असून बॅटरी ऑपरेटेड आहे. याची वाहक क्षमता ३० किलो आहे. या रोबोटला १० मीटरपर्यंत ऑपरेट करता येऊ शकतो. तसेच रुग्णांना खाण्यापिण्याचे सामान, औषधं, उपयुक्त सोयीसुविधा पुरवण्यासाठी हा रोबोट मदत करणार आहे. हा रोबोट सहज हाताळता येणारा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robot patient service starts from tomorrow in chandrapur new experiment in the fight against corona virus aau
First published on: 08-05-2020 at 20:58 IST