Rohit Pawar on Maratha Reservation Protest in Mumbai : मुंबईच्या आझाद मैदानावरील मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणास पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांची झोपण्याची, खाण्यापिण्याची, शौचालयाची योग्य ती व्यवस्था होत नसल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी (२९ ऑगस्ट) मुंबईत झालेल्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखलच चिखल झाला आहे. आज सकाळीही पावसाची रिपरिप चालू होती. त्यामुळे आंदोलकांचा दुसरा दिवसही चिखलातच जाणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “मराठा आंदोलनादरम्यान मुंबई शहरातील पाणपोया बंद आहेत, स्वच्छतागृहांना कुलुपं लावण्यात आली आहेत, आंदोलन करणारी देखील माणसंच आहेत याचा सरकारला विसर पडला असल्याचं दिसत आहे.”
रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी कुलुपं लावण्यात आली आहेत. काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आलं आहे. पिण्याचं पाणी देखील उपलब्ध करून दिलं जात नसल्याचं समजत आहे. तसेच सामाजिक संघटना आंदोलकांना जी मदत पाठवत आहेत ती देखील अडवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं समजत आहे.”
आंदोलकही माणसंच आहेत याचा सरकाला विसर पडलाय की काय? रोहित पवारांचा प्रश्न
“खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक ही देखील माणसंचं आहेत याचा सरकारला विसर पडला की काय? सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही. सरकारने त्वरित मूलभूत सुविधा द्याव्यात आणि आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा. संवाद ठेवल्यास संवेदनशीलता आणि सामंजस्य दाखवण्यास आंदोलक देखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल.”
सरकारचं म्हणणं काय?
दरम्यान, सरकारने रेस्तराँ व खाऊगल्ल्या बंद करायला सांगितलेल्या नाहीत अशी स्पष्ट भूमिका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली आहे. आंदोलकांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात असल्याचं विखे पाटलांनी सांगितलं.