Rohit Pawar On Chandrakant Patil: गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चर्चेचं कारण म्हणजे गौतमी पाटीलच्या कारने ३० सप्टेंबर रोजी वडगाव बुद्रुक या ठिकाणी एका रिक्षा चालकाला धडक दिली असल्याची घटना घडली. या घटनेमध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताच्या प्रकरणात गौतमी पाटीलच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या घटनेत गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केली आहे.

गौतमी पाटीलवर कारवाई व्हावी यासाठी रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत कारवाईची मागणी केली. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ थेट पोलीस उपायुक्तांना फोन केला आणि ‘गौतमी पाटीलला उचलणार की नाही?’ असं म्हणत पोलीस उपायुक्तांना कारवाईचे निर्देश दिले. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. दरम्यान, मंत्री पाटील यांच्या या विधानानंतर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत काही सवाल विचारले आहेत. ‘गुंडांना पाठीशी घालून निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात?’, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांनी काय म्हटलं?

“माननीय चंद्रकांतदादा पाटील, तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळे रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात?”, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.