सातारा : माणिकराव कोकाटे यांना खेळाचा चांगला अनुभव आहे. त्यांना मिळालेल्या क्रीडामंत्री पदासाठी ते या अनुभवाचा चांगला उपयोग करून ते या विभागाला न्याय देतील, अशी कोपरखळीही रोहित पवार यांनी साताऱ्यात मारली. तसेच सर्वसामान्यांना मंत्रीपद देण्याऐवजी फक्त खांदेपालट झाल्याबद्दल रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

कुसगाव (ता. वाई) येथील क्रशरविरोधात आंदोलनाची दखल महसूल मंत्र्यांनी घेत सुनावणीच्या सूचना दिल्या. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही ग्रामस्थांना समर्थन देत उपस्थिती लावली. वाई तालुक्यातील सुमारे अडीचशे ते तीनशे महिला, लहान मुले व जनावरांसह मुंबईकडे चालत निघाले होते. हा महामोर्चा पुण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. त्यानुसार सातारा अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्यासमोर झालेल्या सुनावणीतही रोहित पवार यांनी हजेरी लावली.

यावेळी क्रशरधारक, ग्रामस्थ उपस्थित होते. बुधवारपर्यंत याचा अहवाल जिल्हाधिकारी संतोष पाटील महसूल मंत्र्यांकडे देणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. प्रशासनाने कागदाला कागद योग्य प्रकारे जोडावा. या क्रशरसाठी कोणत्या गॅझेटच्या आधारे, नियमांच्या आधारे परवानग्या दिल्या ते तपासून पाहिल्या पाहिजेत. ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध आहे. प्रकल्पामुळे कोणतीही रोजगार निर्मिती होत नाही. दगड फोडणाऱ्यांचा हा विषय आहे. प्रकल्पामुळे शेतीला आणि घरांना एकत्रित येऊन यास विरोध केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा ग्रामस्थांचा विचार करून अहवाल सादर न केल्यास राज्यभर आंदोलन करू, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.

दरम्यान याच वेळी सध्याच्या राजकीय घडामोडींवर रोहीत पवार यांनी भाष्य केले. नुकत्याच झालेल्या खातेपालटावर बोलताना माणिकराव कोकाटे यांना कोपरखळी मारताना ते म्हणाले, की कोकाटे यांना ‘खेळा’चा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांना मिळालेल्या क्रीडामंत्री पदासाठी ते या अनुभवाचा चांगला उपयोग करून ते या विभागाला न्याय देतील. तसेच सर्वसामान्यांना मंत्रीपद देण्याऐवजी फक्त खांदेपालट झाल्याबद्दल रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.