राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. रोहित पवार यांची तरुण वर्गामध्ये चांगली लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियासह इतर माध्यमांतूनही शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. मात्र, मागील आठवड्यात एका नेटकऱ्यांनं रोहित पवारांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करायचा का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला रोहित पवारांनी मन जिंकून घेणारं उत्तर दिलं आहे.

रोहित पवार यांचा २९ सप्टेंबर म्हणजे आज वाढदिवस आहे. त्यांना राजकीय नेत्यांसह तरुणांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे. मात्र, गेल्या आठवड्यात एका नेटकऱ्यांनं “रोहित पवारचा २९ सप्टेंबरला बर्थडे असून, तो बेरोजगार दिन म्हणून साजरा करायचा का?,” असा प्रश्न विचारला होता. त्यावर रोहित पवारांनी उत्तर दिलं.

“बेरोजगारी ही देशातील भीषण समस्या असून याकडं मीही वारंवार केंद्र सरकारचं लक्ष वेधलंय. वाढदिवसानिमित्त सामाजिक काम करण्याचं आवाहन मी केल्याने बेरोजगारी या सामाजिक प्रश्नावर तुम्ही आवाज उठवला, तर मला आनंदच होईल. याबाबत तुमचे tweet retweet करुन युवांचा आवाज बनण्याचा मीही प्रयत्न करेन,” असं उत्तर रोहित पवारांनी दिलं.

प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी बेरोजगारी संदर्भात केलेल्या ट्विटचा फोटोही शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा झाला. मोदींचा वाढदिवस काँग्रेसनं राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला होता.