Rohit Pawar Shares Video Meghana Bordikar Threatening Govt Officer : परभणी येथे आयोजित एका कार्यक्रमात राज्यमंत्री बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. रोहित पवार यांनी म्हटलंय की “एका कार्यक्रमाला घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली आहे.” परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील बोरी गावातील ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. “कृपया या नेत्यांना आवरा, महाराष्ट्र बेअब्रू होतोय”, अशा शब्दांत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्री व आमदारांना वादग्रस्त वक्तव्ये करण्यापासून रोखण्याचं आवाहन केलं आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “सभागृहात रम्मी खेळणारे, पैशांच्या बॅगा भरणारे, डान्सबार चालवणारे, आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणाऱ्यांमध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्यांची. सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?”

महाराष्ट्राची बेअब्रू होतेय : रोहित पवार

आमदार पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे.कृपया यांना आवरा..!”

…तर कानाखाली मारेन : मेघना बोर्डीकर

रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओत दिसतंय की मेघना बोर्डीकर ग्रामसेवकाला उद्देशून म्हणत आहेत की “तुम्हाला पगार कोण देतंय? तुमची ही चमचेगिरी चालणार नाही. हे प्रकार बंद करा, नाहीतर तुम्हाला आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेन. तुमचा सगळा कारभार मला माहिती आहे. म्हणून मी मुद्दाम तुमच्या वरिष्ठांना इथे बोलावलं आहे. चमचेगिरी करायची असेल तर नोकरी सोडून दे. याद राख हा मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, चमचेगिरी केली तर कानाखाली मारेन.”

व्हायरल व्हिडीओवर मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण

दरम्यान, रोहित पवारांच्या या टीकेला मेघना बोर्डीकर यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी रोहित पवारांची पोस्ट रिपोस्ट करत म्हटलं आहे की, “मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भगिनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाच्या तक्रारी करत असतील तर हा त्रागा व्यक्त होणार, हा राग माझ्या लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी व्यक्त झाला आहे. जिल्ह्याची पालक या नात्याने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ग्रामसेवकाला दिलेली ही समज आहे. सामान्य जनतेला त्रास देवू नका, असा इशारा आहे.”

रोहित पवारांना चिमटा

मेघना बोर्डीकर रोहित पवारांना उद्देशून म्हणाल्या, “कृपया, अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल करणाऱ्या पोस्ट करणं बंद करा. पोलीस ठाण्यात जावून दादागिरी करण्यापेक्षा हे कधीही चांगलं.जय जिजाऊ , जय अहिल्या, जय सावित्री…”