Rohit Pawar On CM devendra fadnavis govt Maharashtra Flood Relief Package : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये पिकासह शेतातील माती देखील वाहून गेली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शेतकर्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर पत्रकार परिषद घेत राज्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत ही घोषणा केली आहे. दरम्यान विरोधकांनी ही मदत पुरेशी नसल्याची टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीतील एका प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय झालं?
आज मुंबईत झालेल्या फिक्की फ्रेम्सच्या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारने देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. यावेळी अक्षय कुमार याने तुम्हाला संत्री आवडतात का? संत्री खाण्याची योग्य पद्धत काय? तुम्ही संत्री कशी खाता? सोलून खाता की की त्याचा रस तुम्हाला आवडतो? असे प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले. यावरून रोहित पवारांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी लोकांचे मुख्य मुद्द्यावरून लक्ष तेवडे भरकटवू नका असे रोहित पवार म्हणाले होते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, “मायबाप सरकार तुम्ही आंबे चोखून खा नाहीतर चावून खा… संत्री कापून त्यावर मीठ टाका नाहीतर तिखट टाका… फक्त मुख्य मुद्द्यावरुन लोकांचं लक्ष भरकटवू नका, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका आणि अश्रू भरलेल्या त्याच्या डोळ्यात तिखट टाकू नका…! संत्र्याची चव चाखतानाच आज कॅबिनेटमध्ये संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी ५० हजार रु. मदत, शेतमजूरांना भरीव मदत आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय घ्यायला विसरू नका…!”
सरकारने मीठ चोळण्याचेच काम केले
यानंतर दुपारी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. यानंतर पुन्हा एकदा रोहित पवारांनी एक पोस्ट केली. ज्यामध्ये ते म्हणाले की, “संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीला या सरकारने पद्धतशीरपणे बगल दिलीच पण अतिवृष्टीने पूर्णतः उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला हात देण्यासाठी हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत देण्याऐवजी NDRF च्या निकषानुसारच तुटपुंजी मदत जाहीर करुन तोंडाला अक्षरशः पानं पुसली. राणा भीमदेवी थाटात ३१ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केल्याची घोषणा केली पण त्याचा हिशोब केला तर शेतकऱ्यांचा झालेला खर्चही वसूल होणार नाही.”
“बागायतीसाठी शेतकऱ्यांचा हेक्टरी ७० हजारपेक्षाही अधिक खर्च झाला असताना हे सरकार केवळ हेक्टरी ३२,५०० रु. मदत देणार आहे. हंगामी बागायतीसाठी २७,५०० रु. तर जिरायतीसाठी १८,५०० रु. शेतकऱ्याच्या हाती टेकवले जाणार आहेत. अशी तुटपुंजी मदत जाहीर करुन या सरकारने आक्रोश करणाऱ्या शेतकऱ्याच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळण्याचंच काम केलं,” असे रोहित पवार म्हणाले आहेत.
सरकार खलनायक निघालं…
“सकाळच्या मुलाखतीत ‘नायक’ चित्रपटातील अभिनेते अनिल कपूर यांचा आदर्श सांगणारे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं तुटपुंजं पॅकेज बघता हे सरकार तर ‘नायक’मधील खलनायक बलराज चौहान निघालं…!” मुख्यमंत्री फडणवीस यांच्या त्याच मुलाखतीतील एक संदर्भ देत अशीही एक पोस्ट त्यांनी केली आहे.