राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पावर यांनी जनतेला एक आवाहन केलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या आजोबांसंदर्भात म्हणजेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासंदर्भात आवहन करणारी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. एका गोष्टीबद्दल शरद पवार कोणाचंही ऐकणार नाही असा तक्रारीचा सूरही रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये लगावला आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी शरद पवार हे ऐकणार नसले तरी लोकांनी एक गोष्ट नक्की करवी अशी विनंती केली आहे.
शरद पवार सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या भागांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फिरत आहेत. याचसंदर्भात पवारांचे या आढावा दौऱ्यातील काही फोटो रोहित यांनी पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करताना रोहित यांनी शरद पवारांना भेटताना सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहन केलं आहे. “लोकांच्या हितासाठी शरद पवार राज्यभर फिरतच राहणार. याबाबत कुणीही नाही म्हणालं तरी तुम्ही (शरद पवार) ते ऐकणार नाहीत. म्हणून मी लोकांनाच कळकळीची विनंती करतो की, शरद पवार यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना भेटत असतानाच स्वत:हूनच योग्य अंतर ठेवण्यासंदर्भातील काळजी घ्यावी,” असं रोहित यांनी हे फोटो शेअर करताना म्हटलं आहे.
पवारांनी औरंगाबादचा घेतला आढावा
शनिवारी (२५ जुलै) शरद पवार हे औरंगाबादमध्ये होते. यासंदर्भातील माहिती आणि आढावा बैठकींचा तपशील पवार यांनीच ट्विटवरुन शेअर केला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा पालकमंत्री व आरोग्यमंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. “कोरोना संकटावर मात करायची तर सर्वांनी एकत्र लढले पाहिजे. देशातील साधारण पाच-सहा राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे, त्यापैकी महाराष्ट्र राज्य महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद या भागातील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. कोरोना लॉकडाऊन काळात स्थानिक लोकांनी अनेक सण साधेपणाने साजरे करून सर्व समाजाला एक उत्तम उदाहरण दिले आहे. प्रादुर्भावाचा डबलिंग रेट हा १४ दिवसांवरून ३० दिवसांवर जाणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे इथली परिस्थिती सुधारण्यासाठी स्थानिकांची नक्कीच मदत मिळेल, असा विश्वास वाटतो. या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी इतकेच नाही तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही यात जबाबदारीने लक्ष घातलं आहे. मात्र लोकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ज्या सूचना सरकार करत आहे त्याचे काटेकोर पालन जनतेकडून होताना दिसत आहे,” असं पवार यावेळी बोलताना म्हणाले.
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा मा. पालकमंत्री व आरोग्यमंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. pic.twitter.com/8PQMVmEMnT
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 25, 2020
लवकरच उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न
“खासगी डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यासाठी जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझॅस्टर मॅनेजमेंट कायदा आहे त्यातील अधिकारांचा वापर करून खासगी डॉक्टरांना समन्स पाठवण्याचा विचार करावा लागेल. मालेगांव धारावीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. जे सहकार्य तिथल्या लोकांनी केले तसेच सहकार्य औरंगाबाद शहरातील जनताही करेल आणि संकटावर मात करेल, अशी खात्री वाटते. केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही. त्यामुळे आता उद्योगधंदा कसा सुरू होईल याकडे लक्ष द्यायला हवे. जसा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसाच राज्याचा आर्थिक प्रश्नही महत्त्वाचा आहे. राज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असंही पवार यांनी म्हटलं होतं.