२६ जानेवारीच्या निमित्ताने आलेल्या सलग सुट्टय़ांमुळे वाढलेल्या वाहतुकीच्या ताणामुळे पुणे- बेंगलोर महामार्गावर चक्काजाम झाला. खंबाटकी घाटात कंटेनर कोसळल्याने खंबाटकी घाटातील वाहतूक ठप्प झाली. तर आणेवाडी टोलनाक्यावर दोन्ही बाजूला टोलसाठी दोन-दोन किमीच्या रांगा लागल्या होत्या, यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. सुट्टी संपवून २६ जानेवारीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी घाईत असणारे अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी वाहतुकीच्या रांगांत रविवारी अडकले होते.
शनिवार, रविवार आणि सोमवारी आलेल्या सलग सुट्टय़ांमुळे पुण्या-मुंबईतून व सातारा, कोल्हापूर, सांगली भागातून पुण्या-मुंबईकडे कामासाठी, नातेवाइकांना भेटण्यासाठी व गावभेटीसाठी, सुट्टय़ांचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण या काळात बाहेर पडल्याने या महामार्गावर वाहतुकीचा एकच ताण आला. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले. खंबाटकी घाटात शुक्रवारी रात्रीच कंटेनर बंद पडल्याने वाहतूक काही काळ बोगद्यामाग्रे वळवण्यात आली होती. शनिवारीही हीच परिस्थिती राहिली. सोमवारी दुपारी कंटेनरचा रॉड तुटल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खंबाटकी बोगद्या माग्रे वाहतूक वळवूनही वाहतुकीवर नियंत्रण मिळवणे अवघड जात होते. महामार्ग पोलीस, खंडाळा व भुईंज पोलिसांनी या सुट्टीकाळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शिकस्त केली. शुक्रवार रात्रीपासूनच वाहतुकीचा महामार्गावर ताण आला होता.
आणेवाडी टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या पुणे व सातारा बाजूला मोठमोठय़ा काही किमीच्या रांगा लागल्यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. सोमवारी या टोलनाक्यावर दोन-दोन किमीच्या रांगा लागल्या होत्या. मंगळवारी सकाळी महामार्गावर सुरूर-पाचवड दरम्यान एका मार्गिकेवर ताण आल्याने अनेक वाहनचालकांनी सुरूर-वाई-पाचवड माग्रे महामार्गावर जाणे पसंत केले. यात कंटेनर, गॅस टँकर, जड वाहने जास्त होती, त्यामुळे वाईमार्गावर सकाळी अकरापर्यंत वाहतूक आस्ते कदम सुरू होती.