राहाता: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे गट) उत्तर जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करीत दोन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली आहे. जिल्हाप्रमुखपदी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन कोते व जगदिश चौधरी यांची निवड केली आहे तर विद्यमान जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्याकडे पक्षाने आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संघटकपदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
ठाकरे गटामध्ये पदाधिकारी फेरबदलाचे वारे जोरात वाहत होते. पक्ष वाढीसाठी खेवरे हे निष्ठेने काम करत नाही, निष्ठावंतांना विचारात घेत नाही, असे आरोप त्यांच्यावर होते. यावर मातोश्रीवर खलबते झाली. खेवरे यांच्यामुळेच शिर्डीत मशाल धगधगत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अंतर्गत शीतयुद्ध थांबता थांबत नव्हते. यातून शिर्डीचे सचिन कोते व जगदीश चौधरी या दोन निष्ठावान शिवसैनिकांकडे खेवरे यांचे जिल्हाप्रमुख पद विभागून देण्यात आले.
जिल्हाप्रमुख सचिन कोते यांच्याकडे शिर्डी, कोपरगाव, संगमनेर विधानसभा मतदारसंघाची तर जगदीश चौधरी यांच्याकडे अकोले, श्रीरामपूर, नेवासा विधानसभेची जबाबदारी देण्यात आली. मुकुंद सिनगर यांची शिर्डी लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिन कोते यांनी यापूर्वी शिवसेनेचे शिर्डी शहरप्रमुख, राहाता तालुकाप्रमुख म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या तर जगदीश चौधरी यांनी यापूर्वी जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. सचिन कोते तसेच जगदीश चौधरी यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवल्याचे समजातच शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
‘स्थानिक’ मध्ये ताकद दाखवू : कोते
शिवसेनेत गटतट नाहीत. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि शिवसैनिकांना सोबत घेऊन काम करू. अनेक दुरावलेले शिवसैनिक आता पुन्हा घरवापसी करणार आहेत. जुन्या आणि नव्यांचा मेळ घालून पक्षाची मजबूत बांधणी करणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची ताकद आपण दाखवून देऊ. यासाठी सर्व शिवसैनिकांनी कामाला लागावे. –सचिन कोते, जिल्हाप्रमुख पक्षाची ताकद वाढवू-चौधरी
मी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम केले असून कधीही पदाची अपेक्षा केली नाही. प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ उपनेते नेहमीच न्याय देतात, याचा मला पुन्हा अनुभव आला आहे. नव्या जबाबदारीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे हिंदुत्व, पक्षाचे ध्येयधोरण आणि विचार गावोगाव पोहोचवून पक्षाची ताकद वाढविण्यावर भर देऊ –जगदीश चौधरी, जिल्हाप्रमुख