एकीकडे चेन्नई सुपर किंग्जचा पूर्ण संघ यंदाच्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीला विजेतेपद जिंकून देण्यासाठी खेळला, त्याचप्रमाणे २०११ साली वर्ल्डकप स्पर्धेत सचिन तेंडुलरकरला वर्ल्डकप जिंकून देण्यासाठी टीम इंडिया खेळली होती. त्यामुळे चेन्नईनं मंगळवारी पहाटे आयपीएलचं पाचवं जेतेपद जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन वानखेडेवर फिरणाऱ्या भारतीय संघाच्याही आठवणी ताज्या झाल्या. सचिन तेंडुलकरभोवतीचं ते वलय अजूनही कायम असल्याचं अजूनही दिसून येतं. त्याच्या याच वलयाच्या माध्यमातून मौखिक आरोग्याबाबत संदेश देण्यासाठी राज्य सरकारने अभिवन मोहीम सुरू केली आहे.

राज्य सरकारने मौखिक आरोग्यावर जनजागृती करण्यासाठी स्वच्छ मुख अभियानाची सुरुवात केली आहे. सचिन तेंडुलकर स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल अॅम्बेसिडर आहे. यासंदर्भात आज झालेल्या कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडुलकरनं गुटखा, तंबाखू अशा गोष्टींपासून लांब राहण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. यावेळी सचिन तेंडुलकरनं त्याच्या वडिलांची एक आठवण सांगितली.

CSK vs GT, IPL 2023: “मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”, महेंद्रसिंह धोनीची अंतिम सामना जिंकल्यानंतर मोठी घोषणा!

“ही समस्या तुम्ही स्वत:हून ओढवून घेतलेली असते”

“तंबाखू वगैरेचा वापर काही लोक करत असतात. लहान मुलं-मुली त्यांना बघतात. त्यांनाही असं वाटतं की हे एवढं घेतायत, आपणही घेऊन बघू एकदा. तेही घेतात. त्यांना हे कळतच नाही की हळूहळू त्यांना या गोष्टीचं व्यसन लागतं. त्याचा परिणाम थेट तोंडाच्या कर्करोगात होतो. पण या लोकांना हे समजत नाही की तोंडाच्या कर्करोगाने काय परिणाम होतात. याचा फक्त त्यांना त्रास होत नाही, त्याचा त्यांच्या आसपासच्या सर्वांनाच त्रास होतो. बऱ्याच कुटुंबांसमोर आर्थिक अडचण असते. त्यात आजाराचं ओझं सांभाळणं कठीण होऊन जातं. पण ही समस्या तुम्ही स्वत: ओढवून घेतलेली असते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतातच. पण याला तुम्ही काहीही कारण देऊ शकत नाही”, असं सचिन यावेळी म्हणाला.

“माझ्या वडिलांनी वचन घेतलं होतं की…”

“मी भारतासाठी जेव्हा पहिल्यांदा खेळलो, तेव्हा माझं वय १६ होतं. मी नुकताच शाळेतून बाहेर पडलो होतो. भारतासाठी खेळायला लागलो, काही जाहिरातीही केल्या. पण तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की तू तंबाखूची जाहिरात कधीच करणार नाहीस. मी बाबांना तेव्हा वचन दिलं होतं की कितीही काहीही झालं तरी मी तंबाखूची जाहिरात करणार नाही”, असं सचिननं सांगितलं.

IPL 2023 CSK vs GT Final: पराभवानंतरही हार्दिक पंड्या असं काही म्हणाला की ज्यानं जिंकली कोट्यवधी चाहत्यांची मनं!

“१९९६ साली माझ्या बॅटवर कोणतेही स्टिकर्स नव्हते. कुणीही प्रमोटर्स नव्हते. दोन वर्षं माझ्या बॅटवर स्टिकर्स नव्हते. मला तंबाखू उत्पादक कंपन्यांनी विचारणा केली होती. मोठ्या रकमांच्या ऑफर्स दिल्या होत्या. काहींनी तर ब्लँक चेक्सही समोर ठेवले होते. पण आज मी गर्वाने म्हणू शकतो की मी तंबाखूशी कोणत्याही प्रकारे संबंधित नव्हतो. मला माहिती आहे की माझे बाबा वरून माझ्याकडे बघत असतील आणि ते या क्षणी खूश असतील की मी यापासून अलिप्त राहिलो”, असंही सचिन तेंडुलकरनं यावेळी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सरकारनं खूप चांगलं काम केलंय या पुढाकारातून. पहिली इनिंग सरकारनं खेळली आहे. आता दुसरी इनिंग लोकांना खेळायची आहे. त्यांनी या सवयी सोडल्या, तर त्यांच्याच आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल. मला विश्वास आहे की चांगलं मौखिक आरोग्य म्हणजेच चांगलं आरोग्य”, असं आवाहन सचिन तेंडुलकरनं भाषणाच्या शेवटी केलं.