यंदाचा आयपीएल सीजन हा महेंद्रसिंह धोनीचा शेवटचा सीजन असेल असं म्हटलं जात होतं. मात्र, धोनीनं पुढील वर्षीची आयपीएलही खेळणार असल्याचे सूतोवाच केले आहेत. त्याामुळे त्याच्या चाहत्यांसाठी आयपीएल विजयापेक्षाही या बातमीनं अधिक आनंद झाला. मात्र, एकीकडे धोनीच्या विजयानं आणि निवृत्ती न घेतल्यानं भारतीय क्रीडाप्रेमींना आनंद झाला असला, तरी खऱ्या अर्थानं चाहत्यांची मनं जिंकली ती गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यानं. हार्दिक पंड्यानं चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही केलेलं विधान हे कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी अभिमानास्पद ठरलं आहे!
रविवारी नियोजित असलेला आयपीएल २०२३ चा अंतिम सामना पावसाच्या व्यत्ययामुळे सोमवारी खेळवण्यात आला. सोमवारीही पाऊस पडल्यामुळे हा सामना मध्यरात्रीनंतर अर्थात मंगळवारी पहाटेपर्यंत लांबला. पण क्रिकेटप्रेमींच्या इतक्या प्रतीक्षेचं सोनं धोनी ब्रिगेडनं अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणल्या गेलेल्या सामन्यात विजय मिळवल्यानं झालं. शेवटच्या दोन चेंडूंवर रवींद्र जाडेजानं लागोपाठ एक षटकार आणि एक चौकार फटकावला आणि आयपीएलच्या यंदाच्या पर्वाचं जेतेपद चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर झालं.




हार्दिक पंड्याच्या कृतीनं सर्वच अचंबित!
सीएसकेच्या विजयानंतर मैदानावर संघाच्या खेळाडूंनी आणि स्टेडियममध्ये सीएसकेच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. देशातल्या कोट्यवधी घरांमध्ये मध्यरात्रीनंतर दिवाळीच असल्याचं वातावरण होतं. खुद्द महेंद्रसिंह धोनीनंही रवींद्र जाडेजाला उचलून घेतल्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. पण या सगळ्यामध्ये सीएसकेकडून पराभव स्वीकारणाऱ्या गुजरात टायटन्सचे खेळाडू प्रचंड नाराज आणि दु:खी झाले होते. त्यांच्या संघातला एकमेव खेळाडू प्रचंड खिलाडू वृत्ती आणि प्रगल्भतेचं दर्शन घडवत होता, तो म्हणजे गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या!
एखादा पराभव, तोही आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभव कसा पचवावा, याचा आदर्शच हार्दिक पंड्यानं घालून दिला. एवढंच नाही, तर हार्दिकनं त्याहीपुढे एक पाऊल जाऊन “जर पराभूत व्हावंच लागलं, तर धोनीकडून पराभूत व्हायला माझी काहीही हरकत नाही”, अशी प्रतिक्रिया दिली आणि गुजरात टायटन्सबरोबरच चेन्नई सुपर किंग्ज आणि देशभरातल्या समस्त क्रिकेटप्रेमींची मनं हार्दिकनं या एका उत्तरानं जिंकून घेतली!
काय म्हणाला हार्दिक पंड्या?
हार्दिक पंड्यानं सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना अत्यंत प्रगल्भपणे दिलेली उत्तरं सध्या व्हायरल होत आहेत. “मी धोनीसाठी खूप खूश आहे. दैवानं त्याच्यासाठी हे सगळं लिहून ठेवलं होतं. जर मला पराभूत व्हावंच लागलं, तर ते धोनीकडून पराभूत होण्याला माझी काहीही हरकत नाही. गेल्या वर्षी चांगल्या गोष्टी चांगल्या लोकांबाबत घडल्या. मला वाटतं धोनी हा मला आत्तापर्यंत भेटलेला एक सर्वात चांगला व्यक्ती आहे. ईश्वर आत्तापर्यंत माझ्याबाबत प्रचंड दयाळू राहिला आहे. पण आज ईश्वरानं मला काकणभर जास्त दिलंय”, असं पंड्या म्हणाला.
पावसानं गुजरातचं नुकसान केलं? हार्दिक म्हणतो…
दरम्यान, पावसामुळे गुजरात टायटन्सनं दिलेलं २१४ धावांचं आव्हान थेट १५ ओव्हर्समध्ये १७१ इतकं खाली आलं. त्यामुळे पावसानं गुजरातचं नुकसान केलं का? या साहजिक प्रश्नावरही हार्दिकनं प्रगल्भ उत्तर दिलं. “मी कारणं देणाऱ्यांपैकी नाही. सीएसकेचा संघ आमच्यापेक्षा चांगला खेळला. आमची बॅटिंग खूपच चांगली झाली होती. विशेषत: साई सुदर्शन. एवढ्या तरुण वयात एखादा खेळाडू अशा सामन्यात येऊन अशा प्रकारची इनिंग खेळून जातो, हे विशेष आहे. माझ्या त्याला शुभेच्छा आहेत. तो त्याच्या आयुष्यात अनेक किमया करुन दाखवेल”, असं हार्दिक पंड्या म्हणाला.
गुजरात टायटन्सच्या कामगिरीवर पंड्या म्हणतो…
“मला वाटतं आम्ही अनेक बाबतीत उत्तम खेळ केला. आम्ही मनापासून खेळलो. एकमेकांसोबत ठामपणे उभं राहाणारा आणि पाठिंबा देणारा आमचा संघ आहे. हे पूर्ण पर्व आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, त्याचा मला खूप अभिमान आहे. आमच्यापैकी कुणीही हार मानली नाही. प्रत्येकजण लढत राहिला. आमच्या संघाचं एक घोषवाक्य आहे. आम्ही एकत्र जिंकतो, आम्ही एकत्र हरतो. कदाचित आजचा दिवस तसाच काहीसा असावा”, असं हार्दिक पंड्यानं यावेळी नमूद केलं.