लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी सांगलीतील विमानतळाची जागा गुजरातच्या व्यापार्‍याला विकल्याचा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सांगलीत केला.

सांगलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये बोलत होते, नुकत्याच ठाकरे शिवसेना पक्षाच्या जनसंवाद मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत येऊन विमानतळ का होऊ शकले नाही,असा प्रश्न उपस्थित केला होता. यावरून उद्योग मंत्री सामंतांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना विमानतळ का करता आले नाही, असा प्रश्न केला.

आणखी वाचा- “त्यांची भांडणं जर मिटली नाही, तर आम्ही २६ तारखेला..”, प्रकाश आंबेडकरांनी दिला अल्टिमेटम!

सांगलीतील विमानतळाची ६६ एकर जागा तत्कालिन उद्योगमंत्र्यांनी गुजरातच्या उद्योजकाला विकली होती. पण आपण उद्योग मंत्री झाल्यावर तो व्यवहार रद्द केल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच सांगलीत आलेल्या उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला जाणे पसंत केले. मात्र सांगलीतल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट देऊ शकले नाहीत, त्यामुळे ते किती काँग्रेसमय झाले आहेत, यावरून स्पष्ट होतं,अशी टीका देखील त्यांनी केली.