शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे हे त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत आणि प्रसंगी वादात आल्याचं पाहायला मिळालं आहे. नुकतंच त्यांनी अमरावतीमध्ये बोलताना थेट राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत केलेलं विधान सध्या वादाचा विषय ठरलं आहे. त्यांच्या आक्षेपार्ह विधानावर राजकीय वर्तुळासह समाजातील विविध घटकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असताना आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी ‘लोकशाही’शी बोलताना संभाजी भिडेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तुषार गांधींना अश्रू अनावर झाले.

संभाजी भिडेंच्या कोणत्या विधानावरून वाद?

संभाजी भिडे यांनी बडनेरातील जय भारत मंगलम येथील सभेत बोलताना महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लीम जमीनदार होते, असं विधान केलं आहे. “मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.

दरम्यान, एकीकडे संभाजी भिडेंच्या या वक्तव्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना तुषार गांधी यांनी वेगळ्याच गोष्टीची चिंता व्यक्त केली. “संभाजी भिडे जे बोलले, ते इतकं घृणास्पद नव्हतं जितकं त्यांच्यासमोर बसलेल्या प्रेक्षकांनी हसून त्या विधानाचं समर्थन करणं घृणास्पद होतं”, असं तुषार गांधी म्हणाले आहेत.

“एकाही महिलेला त्यात स्वत:चा अपमान वाटला नाही?”

“या राज्याच्या मानसिकतेची विकृतता किती झालीये याचं हे उदाहरण आहे. आपल्याला त्याची चिंता असायला हवी की आपला समाज इतका विकृत कसा झाला की विचारांचा द्वेष विचारांनी न करता त्या विचाराच्या व्यक्तीच्या आई-वडिलांबाबत तुम्ही अपमानजनक बोलता. महाराष्ट्राची ओळख पुरोगामी होती. पण तिथे नारीशक्ती इतकी लुप्त कशी झाली की एका आईचा इतका मोठा अपमान केला जात असताना महाराष्ट्रात एकही महिला याविरोधात आवाज उठवत नाही, एकाही महिलेला स्वत:चा अपमान होतोय असं वाटत नाही. ही चिंतेची गोष्ट आहे. हे एका कुटुंबापुरतं मर्यादित नाहीये”, अशा शब्दांत तुषार गांधींनी भिडेंच्या सभेत उपस्थित प्रेक्षकांच्या वर्तनावर आक्षेप घेतला.

“महात्‍मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार”; संभाजी भिडे यांचे खळबळजनक वक्‍तव्‍य

यावेळी तुषार गांधींना अश्रू अनावर झाले. भावनिक होत त्यांनी आपल्याला समाजाच्या या वर्तनाची जास्त चिंता असल्याचं मत व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ही माझ्या दु:खाची गोष्ट नाहीये. इथे महिलांचा अपमान झालाय. पण महिला का गप्प बसून हे सहन करतायत त्याची आम्हाला चिंता आहे. आम्ही आमचं दु:ख जिरवू शकतो. आम्हाला यावर स्पष्टता करण्याची गरज नाही. महाराष्ट्राची जनता हे ऐकून बसून राहिली, गप्प बसून राहिली आणि हसतेय. याची चिंता असायला हवी. याचं मला दु:ख आहे”, असं ते म्हणाले.