scorecardresearch

“…तेव्हा राज ठाकरेंनी जेम्स लेनसोबतच्या लेखकाची माफी मागितलेली”; पवार विरुद्ध राज वादात संभाजी ब्रिगेडची उडी

“राज ठाकरे त्यांच्या आजोबांच्या विचारांच्या पूर्ण विरोधात जाऊन काम करतात. त्यांचे आजोबा सुद्धा नास्तिक होते. ते काय देव धर्म मानत नव्हते.”

Raj Pawar
राज ठाकरेंवर संभाजी ब्रिगेडने साधला निशाणा (फाइल फोटो)

संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगलीमध्ये रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंदरम्यान सुरु असणाऱ्या जेम्स लेन प्रकरणावरुन आपली भूमिका मांडलीय. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधताना राज ठाकरे आजोबांच्या विचारसणीच्याविरोधात काम करत असल्याचा टोला प्रवीण गायकवाड यांनी लगावलाय.

तोंडाला काळं फासून निषेध नोंदवला…
“ज्या वेळेस जेम्स लेन प्रकरण लक्षात आलं तेव्हा पुण्यातील शिवसैनिक आणि शहरप्रमुख राजाभाऊ पारेख यांनी श्रीकांत बहुलकरांना घरी जाऊन काळं फासलं आणि निषेध नोंदवला त्या प्रकरणाचा. कारण बहुलकर हे पूर्वी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे सहलेख होते. यालाही त्यांनी सहकार्य केलेलं. त्यांचा उल्लेख प्रस्तावनेत आहे,” असं गायकवाड म्हणाले.

राज यांनी मागितलेली माफी
“अशाप्रकारे निषेध नोंदवल्यानंतर शिवसैनिकांनी चूक केली म्हणून राज ठाकरे बहुलकरांच्या घरी गेले आणि त्यांची माफी मागितली.
आजपर्यंत राज ठाकरेंनी जेम्स लेनचा कुठल्याप्रकारे निषेध नोंदवलेला मला माहिती नाही,” असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> जेम्स लेन प्रकरण: “ज्यावरून पवारांनी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद पेटवला तो…”; भाजपाकडून पवारांविरुद्ध कारवाईची मागणी

राज ठाकरेंच्या आजोबांच्या पुस्तकांचा दिला संदर्भ
“दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्या ते शरद पवारांना जातीयवादी, नास्तिक म्हणतात. राज ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आहे. प्रबोधनकारांचं साहित्य १९९५ ते १९९९ दरम्यान युतीच्या सरकारने प्रकाशित केलेलं आहे. युती सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये प्रबोधनकारांचं ‘हिंदुत्व’ हे पुस्तक आहे. या पुस्तकात प्रबोधनका ठाकरेंना कशाप्रकारचं हिंदुत्व अपेक्षित होतं, हे लिहिलेलं आहे. ‘देवळाचा धर्म आणि धर्माचं देऊळ’ हे ही पुस्तक त्यांनी प्रकाशित केलंय,” अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

आजोबांच्या विचारांच्याविरोधात काम…
तसेच पुढे बोलताना गायकवाड यांनी, “परंतु आज तर तुम्ही बघितलं तर राज ठाकरे त्यांच्या आजोबांच्या विचारांच्या पूर्ण विरोधात जाऊन काम करतात. त्यांचे आजोबा सुद्धा नास्तिक होते. ते काय देव धर्म मानत नव्हते,” असंही म्हटलंय.

राज ठाकरे नेमकं काय म्हणालेले?
“बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणे. पण कोणत्या पानावर सांगितला ते तर सांगा. यांचे इतिहासकार कोण? तर कोकाटे. महाराजांवर आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहिलं, संभाजी महाराजांवर बाबासाहेबांनी, मेहेंदळेंनी लिहिलं. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज लोकांपर्यंत आणले. पण बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी सुरु आहेत,” असा आरोप राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेमधील भाषणातून केला होता.

पवारांनी काय उत्तर दिलं?
“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराजांना जिजामातांनी घडविले. पण, त्यांना दादोजी कोंडदेव यांनी घडविले, असं पुरंदरे यांनी लिहून ठेवलं होतं. जेम्स लेनने शिवाजी महाराजांबद्दल जे गलिच्छ लिखाण केले त्याची माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरविली होती, असा उल्लेख लेनच्या पुस्तकात आहे. त्यावर पुरंदरे यांनी कधी खुलासा केला नव्हता. यातूनच मी पुरंदरे यांच्यावर टीकाटिप्पणी केली होती व त्याबद्दल मला अभिमान आहे,” असं शरद पवार यांनी म्ह़टलं होतं. यानंतर मनसेने २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेलं एक पत्रच जाहीर करत शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sambhaji bridge on sharad pawar vs raj thackeray over shivaji hindu king in islamic india author james laine issue scsg

ताज्या बातम्या