सांगली : शिराळा येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतीस्थळाचे काम निर्धारित वेळेत व दर्जेदारपणे पूर्ण करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळाच्या कामाचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत घेतला. यावेळी आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, शिराळा नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज कांबळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्मृतीस्थळ विकासासाठी राज्य शासन निर्णयानुसार जवळपास १३ कोटी ४६ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता प्राप्त आहे. स्मृतीस्थळ आराखड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, मुख्य प्रवेशद्वार, जीवनपट दर्शवणारा वाडा, स्वच्छतागृहे, विद्युतीकरण, अग्निशमन व्यवस्था, पार्किंग आदी बाबींचा समावेश आहे. या सर्व कामांचा मंत्री पाटील यांनी आढावा घेतला.