Jitendra awhad: “कोल्हापूर जिल्हा पुरोगामीत्वासाठी ओळखला जातो. संविधानाचा मूळ पायाच फुले-शाहू-आंबेडकर आहेत. त्यांच्या वारसदारांनीच दंगल घडविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे, हे महाराष्ट्राला न शोभणारे आहे”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. आज आव्हाड यांच्या वाहनांवर तीन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलत असताना माजी खासदार संभाजीराजेंना लक्ष्य केले. विशाळगडावर झालेल्या दंगलीप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेवर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांच्यात शाहू महाराजांचे रक्त आहे का? हे तपासावे, असेही विधान केले होते. या विधानावर त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, मी मेलो तरी माफी मागणार नाही. उलट संभाजीराजेंनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहीजे. त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे एक मशीद पाडली गेली.

संभाजीराजे आरोपी क्रमांक एक

माजी खासदार संभाजीराजेंवर टीका करताना आव्हाड म्हणाले, “संभाजीराजेंनी दुसऱ्या टोळक्याला गडावर जाण्याची संधी दिली आणि त्यामुळे तोडफोड झाली. संभाजीराजे क्रमांक एकचे आरोपी आहेत. तरीही मी त्यांना अटक करण्याची मागणी केली नाही. तसेच आज जो हल्ला झाला, त्यावरही मी पोलीस तक्रार करणार नाही. मी माझे म्हणणे मांडत राहणार. माझी विचारांची लढाई आहे, ती मी लढत राहणार.”

हे वाचा >> Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला; ‘संभाजीराजे शाहू महाराजांचे वारसादर नाहीत’, या विधानानंतर समर्थकांचा हल्ला

वडील खासदार झाले म्हणून संभाजीराजेंचा जळफळाट

शाहू छत्रपती खासदार झाल्यामुळे त्यांचा मुलगा संभाजीराजेंचा जळफळाट झाला आहे, असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. संभाजीराजे खासदारकीसाठी अनेक पक्षांच्या दारोदारी भटकत होते. पण त्यांना कुणी उमेदवारी दिली नाही. वडील खासदार झाल्यामुळेच संभाजीराजे बेतालपणा करत आहेत. हे सत्य मी आज महाराष्ट्राला सांगत आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

हे वाचा >> विशाळगड अतिक्रमण प्रश्नी संभाजीराजेंचा राजकीय हेतू कोणता? कोल्हापुरात सकल हिंदू समाजाची विचारणा

प्रकरण काय?

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्याकडून विशाळगड येथे आंदोलनही करण्यात आले. मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने विशाळगडावर काही समाजकंटकांनी तोडफोड केली. यानंतर संभाजीराजेंवर टीका करत असताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “संभाजीराजेंना आता छत्रपती म्हणणे सोडून द्या. कारण त्यांना वंशपंरपरागत जो अधिकार मिळाला होतो, तो पुढे घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी होती. शाहू महाराज आणि संभाजीराजेंच्या रक्तात काय आहे? हे तपासण्याची गरज आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असे विधान करतो की, ज्यामुळे दंगल उसळते, तो शाहू महाराजांच्या घरातील असूच शकत नाही. त्यामुळे त्यांना छत्रपती कुणी म्हणावे, याचा विचार झाला पाहीजे. ज्यांच्याकडे कर्तुत्व आहे, त्यांना छत्रपती म्हणावे. आताचे शाहू महाराज यांना मी नक्कीच छत्रपती म्हणेण. कारण त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लोकांची माफी मागितली. जे राजेघराण्यातील लोकांनी करायला पाहीजे, ते शाहू महाराजांनी केले होते, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.