माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या वडिलांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बालपणातील अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच वडील आणि मुलगा यांच्यातील भावनिक बंध उलगडून सांगताना शाळेत असताना कसे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले हा प्रसंगही नमूद केलं. संभाजीराजेंनी शनिवारी (७ जानेवारी) एक फेसबूक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “आदरणीय बाबा, ‘महाराज’. श्री शाहू छत्रपती महाराजांचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस. मला आदर्शवत आणि खऱ्या अर्थाने माझे मार्गदर्शक असलेल्या बाबांविषयी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे. छत्रपती घराण्याची थोर परंपरा जपण्यासाठी अहोरात्र दक्ष असणारे महाराज, बाबा म्हणूनही तितकेच संवेदनशील आहेत.”

“बाबांनी लहानपणापासून आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून दिली”

“लहानपणापासून त्यांनी आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. राजघराण्यात जन्माला आल्यामुळे समाजात जो मानसन्मान किंवा विशेष वागणूक मिळते, त्यापासून त्यांनी आम्हाला कटाक्षाने लांब ठेवले. लोकांमध्ये मिसळल्याशिवाय त्यांची सुख-दुःखे समजणार नाहीत हा त्यांचा उद्देश असायचा,” असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.

“…तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट जाणवायची”

संभाजीराजे पुढे म्हणाले, “बाबांनी आमच्यावर उत्तम संस्कार व्हावेत याची काळजी नेहमी घेतली. शालेय शिक्षणासाठी मला राजकुमार कॉलेज राजकोट येथे पाठविण्यात आले होते. याच शाळेमध्ये राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी शिक्षण घेतले होते. कोल्हापूरला सुट्टीला आल्यानंतर, बाबा सुट्टी संपल्यावर मला सोडायला दरवेळी राजकोटला यायचे. शाळा जसजशी जवळ यायची तसतसे माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असत आणि महाराजांच्या चेहऱ्यावरची काळजी व त्यांच्या मनाची घालमेल स्पष्ट जाणवायची.”

हेही वाचा : “छत्रपती शिवराय किंवा छत्रपती संभाजीराजेंबाबत बोलताना..” शाहू महाराजांनी दिला मोलाचा सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बाबा मला मिठी मारायचे, तेव्हा डोळ्यातून अश्रू यायचे”

“शाळेच्या गेटवर बाबा मला मिठी मारायचे, तेव्हा डोळ्यातून अश्रू यायचे. राज्यसभेवर खासदार म्हणून माझी निवड झाली आणि नवीन राजवाड्याच्या पोर्चमध्ये पहिल्यांदा बाबांची भेट झाली तेव्हा मारलेली मिठी, डोळ्यातून आलेले अश्रू यातील प्रेम, जिव्हाळा, काळजी तितकीच होती, जितकी राजकुमार कॉलेजच्या गेटवर मारलेल्या मिठीत होती,” असंही संभाजीराजेंनी नमूद केलं.