Final Phase of Samruddhi Mahamarg : कोणत्याही निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आले की अनेक किस्से घडत असतात. आज समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यातही असाच एक भन्नाट किस्सा घडला आहे. उद्घाटनावेळी फित कापायला गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या हाती केवळ कापलेली फित आली आणि त्यांनी तीच फित पुन्हा कापली.

त्याचं झालं असं की समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तिघेही उभे राहिले. या तिघांसमोर फुलांचा ट्रे आला. या ट्रेमध्ये तीन कात्र्या होत्या. यातील तिन्ही कात्र्या प्रत्येकाने आपआपल्या हातात घेतल्या. कात्री हातात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या कानात काहीतरी पुटपुटले. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी स्मित हास्य केलं. तसंच, अजित पवारही यावेळी किंचित हसले.

हे सगळं सुरू असताना हातात कात्री घेऊन सज्ज असलेल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समोरची लाल फित कापली आणि मध्ये उभे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या हातात कापलेली फित उरली. मुख्यमंत्र्यांच्या हातून हा कार्यक्रम व्हायला हवा या हेतुने त्यांनी कापलेलीच फित पुन्हा कापली आणि फितीचा उरलेला तुकडा तिथे उपस्थितांच्या हाती दिला. या प्रसंगामुळे क्षणभर तिथे हशा पिकला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६ तासांचा प्रवास आठ तासांवर

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने संपूर्ण ७०१ किमी लांबीचा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे आता नागपूर – मुंबई प्रवास १६ तासांऐवजी आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ठाणे खाडी पूल-३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पणही पार पडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मार्गिकेचं लोकार्पण केलं. या मार्गामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक सुकर होणार आहे.