शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सातत्याने भारतीय जनता पक्षावर टीका होत आहे. पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभेचे खासदार संजय राऊत भाजपावर हल्ला करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आडनावावरून केलेल्या टीकेमुळे काँग्रेस नेते राहुल गांधींवर झालेल्या कारवाईनंतर देशात हुकुमशाहीला सुरुवात झाल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

मनसे नेते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. देशपांडे यांनी सकाळी एक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, ज्या काँग्रेसने देशात आणीबाणी लावली त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला. आताचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच काँग्रेसचा भाग होता. हेच लोक आता लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळे काढतायत. आणीबाणी ही इतिहासातील चूक होती हे माविआ मान्य करेल का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

हे ही वाचा >> ‘धर्मवीर’ सिनेमात ‘वसंत डावखरे’ साकारणाऱ्या अभिनेत्याचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…की घरी बसून अंडी उबवणार?” देशपांडेंचा टोला

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. काँग्रेस नेते सातत्याने सावरकरांवरून भाजपाला लक्ष्य करत आहेत. तर राज्यातील भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाकडून याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील मालेगावच्या सभेत बोलताना राहुल गांधींना ठणकावलं. “सावरकरांचा अपमान सहन करणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावरून संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. काल पत्रकार परिषदेत देशपांडे म्हणाले की, “सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नक्की काय करणार?” हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं.” देशपांडे म्हणाले की, उद्या राहुल गांधी पुन्हा एकदा सावरकरांचा अपमान करतील. मग हे काय फक्त सामनात अग्रलेख लिहिणार की घरी बसून अंडी उबवणार? नेमकं करणार काय ते त्यांनी सांगावं.