सांगलीच्या जत तालुक्यातल्या उमदी येथील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली असून २० विद्यार्थ्यांना मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी २८ ऑगस्ट रोजी पहाटे १ वाजेपर्यंत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार उमदी (ता. जत, जि. सांगली) येथील समता अनुदानित (VJNT साठीची) आश्रमशाळेतील जवळपास १६९ विद्यार्थ्यांना रविवारी दि. २७ रोजी रात्री उशिरा अन्नातून विषबाधा (food poisoning) झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ व जत येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तेथे विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली आहे.

२४ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

एकूण १६९ रुग्ण ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे आले होते. त्यापैकी ७९ रुग्ण सध्या ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे. उर्वरित सर्व रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत. माडग्याळ, जत व मिरज तिन्ही ठिकाणी डॉक्टरांना तात्काळ व सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी घटनेची माहिती व दखल घेतली असून, विद्यार्थ्यांच्या उपचारांत कोणतीही उणीव ठेवू नये, अशा सूचना त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची यंत्रणा व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत. तसेच, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांना सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याच्या व दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.