संगमनेर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी मे आणि जून महिन्यांपासून पाऊस सुरू असल्याने निळवंडे आणि भंडारदरा धरणांमध्ये पाण्याची समाधानकारक उपलब्धता झालेली आहे. परिणामी, या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमार्गे होत आहे.
मात्र दुसरीकडे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना पत्र लिहून केली आहे.
थोरात यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक समाधानकारक आहे. त्यामुळे नदी मार्गे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. मात्र, निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र हे पर्जन्य छायेखाली येते. त्यामुळे अद्यापही लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही. लाभक्षेत्रात शेतीसाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या कायम आहे. हा विरोधाभास लक्षात घेता, निळवंडे धरणातील अतिरिक्त (ओव्हरफ्लो) पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीने सोडणे अत्यावश्यक आहे.
या दुष्काळी पट्ट्यात आत्ताच पाणी सोडले तर ते पाणी अडवले जाईल, जिरवले जाईल आणि त्यातून बरेच क्षेत्र सिंचनाखाली येऊन वर्षभर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ डाव्या आणि उजव्या दोनही कालव्यांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी थोरात यांनी केली आहे. या मागणीमुळे निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
थोरात यांनी लिहिलेल्या पत्रावर प्रथमच बदललेला लोगो बघावयास मिळाला. मागची ४० वर्ष आमदार, विविध खात्यांचे मंत्री असताना शासनाचे राजचिन्ह त्यांच्या पत्रावर दिसायचे. आता नवीनच लोगो दिसत असल्याने त्याची चर्चा होऊ लागली आहे. नवीन लोगो मध्ये कडेने गव्हाच्या ओंब्या, मध्ये गाईचे चित्र आणि त्यावर जयहिंद असे लिहिलेले आहे. बदललेल्या या नवीन लोगो विषयीची माहिती देखील थोरात यांनी लिहिलेल्या पत्राच्या तळाशी आहे.
त्यानुसार माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे हे पत्रव्यवहारासाठी हा लोगो वापरत असत. कृषी आणि सहकार चळवळीप्रति असलेली आपली बांधिलकी आणि परंपरा पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने हा लोगो बाळासाहेब थोरात यांच्या पत्रावरही वापरत असल्याचे म्हटले आहे.