संगमनेर: शहर पोलिसांनी ‘रील’ तयार करण्यासाठी बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शहरातील जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील फुटपाथवर संगमनेर महाविद्यालय ते वीज स्टेशनसमोर घडला.
समाजमाध्यमावर प्रसारित झालेल्या चित्रफितीमुळे हा अपघात समोर आला. चित्रफितीत, यश अनूप अरगडे (वय २०, रा. गुंजाळवाडी, संगमनेर) हा त्याची बुलेट (एमएच ०४ एलए २५३१) मुख्य रस्त्याऐवजी फूटपाथवरून भरधाव चालवत होता. २६ ऑगस्टच्या रात्री १२:३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातात यश स्वतः आणि त्याचा मित्र प्रतीक सचिन गुंजाळ (वय १८) दोघेही गंभीर जखमी झाले.
ही चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत चित्रफितीची सत्यता पडताळून पाहिली आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार कायदेशीर कारवाई केली. तपासात असे निष्पन्न झाले, की यशचा मित्र शिवम दिघे याने आपल्या मोबाइलमध्ये चित्रीकरण केले आणि नंतर समाजमाध्यमातून प्रसारित केले. यशला चिथावणी दिल्याबद्दल शिवमविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणीही बेदरकारपणे वाहन चालवताना आढळल्यास त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिला आहे.