सांगली : अपंग वित्त महामंडळाची कर्ज प्रकरणे मंजूर करून जास्तीत जास्त अनुदान मिळवून देतो, असे सांगून एका महिलेने पतीच्या मदतीने पाच जणांना 4 कोटी 45 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात संबंधित पती-पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शनिवारी मिळाली.
संशयित महिलेने आपण महसूल विभागात वसुली अधिकारी असल्याचे सांगत महाराष्ट्र शासन महसूल विभाग नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग असा मजकूर असलेले बनावट ओळखपत्र दाखवले. महिला व तिचा पती यांनी ओळख निर्माण करून विडास संपादन केला. आणि शंभर रुपयांच्या मुद्रांकावर महाराष्ट्र राज्य वित्त अपंग महामंडळ, कोल्हापूर या नावे अनामत रकमेचे करारपत्र करून दिले. या करारपत्राच्या आधारे रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील दोघांकडून, हातीद (ता. सांगोला) येथील दोन व आरवडे (ता. तासगाव) येथील एक अशा पाच व्यक्तींकडून चार कोटी 45 लाख 35 हजार रुपये घेतले. पुढे कोणतेही कर्ज मंजूर झालेले नाही अथवा अनुदानही मिळाले नसल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.
फसवणुक झालेले पाचही जण एकमेकांचे नातलग असून त्यांना अपंग विकास महामंडळाकडून मोठ्या रकमेचे कर्ज मिळवून देण्याबरोबरच अनुदानही मिळेल असे सांगून गेल्या 29 सप्टेंबर 2023 पासून आजअखेर टोलवा टोलवी केली. कर्जासाठी भरण्यात आलेल्या रकमेची वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर संबंधितांकडून या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून संशयित पती-पत्नीच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा प्रकार आर्थिक फसवणुकीचा असल्याने सदरच्या गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. संशयित महिला शासनाच्या महसूल विभागात वसुली अधिकारी असल्याचे खरे वाटावे यासाठी देशाचे बोधचिन्ह असलेले ओळखपत्रही बनावट तयार करण्यात आले होते.या ओळखपत्राच्या आधारे महिला व तिच्या पतीने आर्थिक फसवणुक केल्याचे समोर आले असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत आहे.