सांगली : मृत्यूपश्चात पुण्य कमवायचे असेल तर अवयवदानासारखी दुसरी संधी नाही. मरावे परी अवयवरूपी उरावे, या उक्तीप्रमाणे दान केलेल्या अवयवांच्या माध्यमातून कोणताही नागरिक मृत्यूनंतरही जिवंत राहू शकतो. त्यामुळे अवयवदान चळवळीचा सांगली पॅटर्न तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.

राज्य शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये अवयवदानाची ऐच्छिक चळवळ आगामी चार महिन्यांत राबवण्यात येत आहे. अवयवदानासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला असून, तो मोबाईलवर स्कॅन करून प्राप्त अर्जात माहिती भरल्यास अवयवदानाची नोंद होणार आहे. या कोडचे जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, सांगली व तहसील कार्यालय, मिरज येथे जिल्हाधिकारी श्री. काकडे यांच्या हस्ते प्रत्यक्ष अनावरण करण्यात आले.

शासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना लोकाभिमुख उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, अवयवदानाचे महत्त्व कुटुंबालाही समजून सांगावे. केवळ नोंद करून थांबू नका, तर यासाठी जनजागृती करण्यात कृतीशीलता आणा. नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व सांगून त्यांच्या मनोवृत्तीत बदल घडवावा. दृढनिष्ठेने ही चळवळ पुढे न्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपक्रमाच्या पहिल्या दिवशी अवयवदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ३० अर्ज, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात २५ अर्जांची नोंदणी झाली.