सांगली : देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित जिल्हा अंतर्गत तीन टप्प्यांमध्ये जिल्ह्याचा विकास आराखडा निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे नियोजन केले असून, त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रांच्या योगदानातून जिल्ह्याचा विकासदर वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, केंद्र व राज्य शासन बळीराजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू झाल्यापासून सांगली जिल्ह्यात वैयक्तिक घटकांमध्ये एक हजार ३४९ उद्योग उभारले आहेत. या योजनेचे प्रकल्प मंजूर करण्यात सांगली जिल्हा देशात तिसरा आहे. सांगली जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण ६४ हजार १४६ मेट्रिक टन कृषी मालाची निर्यात केली आहे. यात फळे, भाजीपाला, अन्नधान्य व मसाला पिके यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधून जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजारहून अधिक लाभार्थींना एकूण २० हप्त्यामध्ये १५३७ कोटी ६० लाख रुपये वितरीत केले असल्याचे त्यांनी सांगितले.

सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आरोग्य विभागाच्या एकूण कामास ९३ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. कर्करोग जनजागृती वाहनाद्वारे जवळपास ७ हजार महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली आहे. तसेच, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम अंतर्गत ५९१ कोटी २९ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला असून, पुढील कार्यवाही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.