सांगली : ऑगस्टमध्ये आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील १३ हजार ४७५ शेतकऱ्यांच्या चार हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, भरपाईपोटी सुमारे साडेसात कोटी रुपये निधीची मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.

ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि कृष्णा-वारणा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीपिके, फळपिके यांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने शेतीपीक व फळपीक पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला आहे. घरांची पडझड व गोठ्यांच्या नुकसानीच्या अनुषंगाने तालुकास्तरावर पंचनामे करण्यात आले असून, बांधकाम विभागाकडून प्राप्त होणाऱ्या मूल्यांकनाच्या आधारे अनुदान वितरण करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतीपीक व फळपिकाचे पंचनामे करण्यात आले आहेत. यामध्ये फळपीक सोडून बागायती पिकाखालील बाधित क्षेत्र ४०४८ हेक्टर असून, बाधित शेतकऱ्यांची संख्या १३ हजार ३३९ आहे. नुकसानभरपाईपोटी ७ कोटी ३८ लाख ७२ हजार रुपये अपेक्षित आहे. फळपिकाखालील बागायत क्षेत्र २६.२६ हेक्टर असून, बाधित शेतकऱ्यांची संख्या १३६ आहे. त्यासाठी ६ लाख ६५ हजार रुपये नुकसानभरपाईपोटी अपेक्षित आहेत. असे एकूण बाधित ४०७४.२१ हेक्टर क्षेत्र असून, बाधित शेतकऱ्यांची संख्या १३ हजार ४७५ आहे. यासाठी नुकसानभरपाईपोटी एकूण ७ कोटी ४५ लाख ३७ हजार ९०० रुपयांच्या निधीची मागणी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे. पूरस्थितीचा जिरायत शेतीला फटका बसलेला नाही.

घरांची पडझड व गोठ्याच्या नुकसानीच्या अनुषंगाने तालुकास्तरावर पंचनामे करण्यात आले आहेत. यामध्ये ७ अंशत: पक्की घरे, ८२ अंशत: कच्ची घरे व एका गोठ्याचे नुकसान झाले आहे. बांधकाम विभागाकडून प्राप्त होणाऱ्या मूल्यांकनाच्या आधारे अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात ८३९ इतके दुकानदार, गॅरेज, टपरीधारक यांचे नुकसान झालेले असून, पंचनामे करण्याचे काम तालुकास्तरावर सुरू आहे. पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच शासनाकडे अनुदान मागणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात घरात पाणी शिरून १२७६ इतक्या बाधितांचे भांडी व कपड्याचे नुकसान झालेले असून, त्यांच्या पंचनाम्याच्या आधारे अनुदान वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. ऑगस्ट मध्ये शिराळा, वाळवा तालुक्यात अधिक प्रमाणात झाला होता. तर पश्चिम घाटात झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. याचा फटका नदीकाठी असलेल्या बागायती पिकांना बसला.