सांगली : सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या फळ महोत्सवात तीन दिवसांत ९ लाख रुपयांची उलाढाल झाली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सांगली जिल्ह्यातील फळउत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे व मॅग्नेट प्रकल्पांतर्गत फळांवर प्रक्रिया करून त्याची उत्पादने तयार करण्याकरिता शेतकऱ्यांना पणन मंडळामार्फत यापुढेही सहकार्य केले जाईल, असे कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक डॅा. सुभाष घुले यांनी सांगितले. या वेळी कृषी पणन मंडळाचे पणन अधिकारी ओंकार माने, प्रतीक गेनुगडे, अनिल जाधव, सुयोग टकले, संदेश पिसे, सुशांत खाडे उपस्थित होते.
फळ महोत्सवामध्ये सांगली जिल्ह्यातील जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील पिवळे व गुलाबी ड्रॅगनफ्रूट, विटा व वाळवा तालुक्यातील पेरू, चिकू, केळी, तसेच आटपाडीचे अंजीर, डाळिंब, सीताफळ व विविध फळांची विक्री शेतकऱ्यांमार्फत करण्यात आली. या महोत्सवात एकूण २२ फळ उत्पादकांनी सहभाग घेतला होता. महोत्सवामध्ये विविध फळांचा देखावा लोकांचे आकर्षण ठरला. जत तालुक्यातील ड्रॅगन उत्पादक शेतकऱ्याने तयार केलेले ड्रॅगनफ्रूटचे आईस्क्रीम पहिल्यांदाच सांगली शहरवासीयांना चाखायला मिळाले. तसेच मॅग्नेट प्रकल्पांतर्गत व्यंकटेश ग्रो यांनी तयार केलेली जांभूळ, लिंबू, पपई व स्ट्रॉबेरीपासूनची उत्पादने महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध होती.
पणन मंडळाकडून आयोजित केलेल्या या महोत्सवात सहभागी झालेल्या संभाजी कोडग, विजय मोरे, प्रवीण कुंभार इत्यादी शेतकऱ्यांनी पणन विभागाचे आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आभार मानले व पुढेही असेच महोत्सव आयोजित करण्याबाबत विनंती केली.