सांगली: कर्नाटकातील दोन विधानसभा मतदार संघाची जबाबदारी भाजपने सांगली जिल्ह्यातील दोन नेत्यांवर सोपवली असून हे दोन्ही नेते या दोन मतदार संघातील प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. कन्नड व मराठी भाषेवर प्रभुत्व असलेले भाजपचे नगरसेवक शेखर इनामदार आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमणगौडा रविपाटील या कन्नड व मराठी भाषेवर प्रभुत्व असलेल्या नेत्यांवर ही जबाबदारी भाजपने सोपवली आहे.
इनामदार यांच्यावर रायबाग मतदार संघाची आणि रवि पाटील यांच्यावर इंडी तालुययातील मुद्देब्याळ या विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रचारामध्ये सूसुत्रता राखणे, वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभांचे नियोजन करणे, मतदार बहुल क्षेत्रामध्ये स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत याची माहिती सभेपुर्वी वरिष्ठ नेत्यांना पुरविणे आदी कामाची जबाबदारी या नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.
आणखी वाचा- “मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं”, ‘त्या’ फलकबाजीवरून रामदास आठवलेंचा राष्ट्रवादीला टोला
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कागवाड रस्त्यावर सांगली पोलीसांनी दिवसरात्र जागता पहारा ठेवला असून कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करणार्या वाहनांची झाडाझडती घेण्यात येत आहे. यासाठी वाहतूक पोलीस व मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी बारा-बारा तासांची सेवा सीमेवर देत आहेत. कर्नाटकातून येणार्या प्रत्येक वाहनांची व कागदपत्रांची तपासणी करूनच महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये प्रवेश दिला जात आहे.