सांंगली: सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असताना ठाकरे शिवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांची एकतर्फी उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस आक्रमक झाली असून जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे आता दिल्लीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

सांगली लोकसभेसाठी भाजपने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर करून आठ दिवस झाले तरी महाविकास आघाडीमध्ये ठाकरे  शिवसेना आणि काँग्र्रेस यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. असे असताना दि.२१ मार्च रोजी मिरजेतील जनसंवाद मेळाव्यात पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पैलवान पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर ठाकरे शिवसेनेचे अतिक्रमण परतवून  लावण्यासाठी काँग्रेसची सर्व जेष्ठ नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. माजी राज्यमंत्री आ. डॉ. विश्‍वजित कदम, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका जयश्री पाटील यांच्यासह उमेदवारीसाठी इच्छुक असलेले प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आदी मुंबईत तळ मारून आहेत.

हेही वाचा >>>दहावी, बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर विभागात

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगली ही  परंपरागत काँग्रेसची जागा असल्याने ठाकरे शिवसेनेने उमेदवार कसा जाहीर केला असा सवाल करत कोणत्याही स्थितीत सांगलीमध्ये काँग्रेसचाच उमेदवार असेल असे सांगितले. तर याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असून या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.