पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत बारावीच्या परीक्षेत गैरप्रकारांचे प्रमाण कमी झाले असून, दहावीच्या परीक्षेत गैरप्रकारांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. दोन्ही परीक्षांमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक गैरप्रकार झाले आहेत.

राज्य मंडळातर्फे बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत घेण्यात आली. यंदा बारावीच्या परीक्षेत राज्यभरात ३०६ गैरप्रकारांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक १४२ गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाअंतर्गत झाले. त्या खालोखाल पुणे आणि नागपूरमध्ये प्रत्येकी ६८, लातूरमध्ये २६, नाशिकमध्ये २३, मुंबई आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी ११, कोकण विभागात ७ गैरप्रकार झाले. कोल्हापूरमध्ये एकही गैरप्रकार नोंदवला गेला नाही. गेल्यावर्षी ३४५ गैरप्रकारांची नोंद झाली होती.

हेही वाचा…मोठी बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने

यंदा दहावीच्या परीक्षेत एकूण १४० गैरप्रकारांची नोंद झाली. सर्वाधिक ८६ गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात नोंदवले गेले. त्या खालोखाल पुणे मंडळात १९, नागपूर मंडळात १३, लातूरमध्ये १०, नाशिकमध्ये सहा, अमरावतीमध्ये पाच, मुंबईमध्ये एका गैरप्रकाराची नोंद झाली. कोकण आणि कोल्हापूर मंडळात एकही गैरप्रकार नोंदवला गेला नाही. तर गेल्यावर्षी एकूण ११६ गैरप्रकार प्रकरणांची नोंद झाली होती.

हेही वाचा…खळबळजनक..! मृतदेहाची इन्स्टाला स्टोरी (स्टेटस) ठेवली; ‘त्या’ तरुणाची अपहरण करून केली हत्या

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की दहावी, बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. दोन्ही परीक्षांदरम्यान अडचणी आल्या नाहीत. परीक्षांतील गैरप्रकारांची आकडेवारी पाहता क्षेत्र स्तरावर समुपदेशाचे प्रयत्न वाढवण्याची गरज आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील केंद्रांमध्ये पुढील वर्षी बदल करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यात जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या केंद्रावरील विद्यार्थी संख्या कमी करण्यात येईल.