सांगली : केंद्र शासनाचे साखरेची कमीत कमी विक्री किंमत ४ हजार ३०० रुपये क्विंटल करणे गरजेची आहे, तरच साखर कारखानदारी टिकेल, असे प्रतिपादन विश्वास सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले. चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास सहकारी साखर कारखान्याचा गाळप शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिराळा येथील महायोगी गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ उपस्थित होते.
गाळप शुभारंभ प्रसंगी श्री. नाईक म्हणाले, केंद्र शासनाने सातत्याने उसाच्या किमान खरेदी दरात सतत वाढ केली आहे. त्या तुलनेत साखरेची किमान विक्री किंमत वाढ केलेली नाही. त्यामुळे उसाची किमान खरेदी किंमत, तोडणी व वाहतूक, साखर तयार करण्याचा प्रक्रिया खर्च पाहता साखरेचा विक्री दराचा मेळ बसत नाही. त्यासाठी साखरेचा किमान विक्रीचा दर चार हजार तीनशे रुपये करणे गरजेचे आहे, तरच साखर कारखानदारी टिकणार आहे.
पावसाच्या लहरीपणाचा शेतकर्यांसह साखर व्यवसायाला गेल्या दोन, तीन वर्षात मोठा फटका बसत आला आहे. उसाचे एकरी उत्पादन घटले आहे. कार्यक्षेत्रात असणार्या प्रमुख वारणा, मोरणा व कडवी नदीकाठच्या ऊस उत्पादक शेतकर्यांसह सर्व पिकांचे नुकसान होत आले आहे. या वर्षी तर ८ मे पासून पावसाळ्यास सुरूवात झाली असून आज अखेर पावसाची हजेरी सुरूच आहे. ऊस पिकाला साखर उतारा मिळण्यासाठी थंडी (हिवाळा) आवश्यक असतो. मात्र आजअखेर हिवाळ्याचा मागमूस नाही. विश्वास’ची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने आम्ही हित डोळ्यापुढे ठेवून उसाची आधारभूत किमतीपेक्षा जास्तीचा म्हणजेच ३ हजार २७५ रुपये दर दिला आहे. या गळीत हंगामात सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून नियोजन केले आहे. नोंदीप्रमाणे तोडी देण्यात येतील. शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील सभासद, ऊस उत्पादकांनी पिकवलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. पीर पारसनाथ यांच्या हस्ते विधिवत वजन काटा पूजन करण्यात आले. त्यांच्यासह अध्यक्ष, संचालकांच्या उपस्थितीत गव्हाणीत उसाची मोळी टाकून चालू हंगामातील गळीत हंगामाचा प्रारंभ केला. यावेळी संचालक विराज नाईक, दिनकरराव पाटील, हंबीरराव पाटील, सुरेश चव्हाण, बाबासो पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी पाटील, सुरेश पाटील, शिवाजी पाटील, बिरुदेव आमरे, सुहास घोडे-पाटील, संदीप तडाखे, सुकुमार पाटील, तुकाराम पाटील, आनंदराव पाटील, यशवंत दळवी यांचेसह कोंडिबा चौगुले, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजय देशमुख, खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील यांनी आभार मानले.
