सांगली : गेले दहा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाची उद्या शनिवारी सांगता होत असून, गणेश विसर्जनासाठी मिरज नगरी सज्ज झाली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ऐतिहासिक, पौराणिक प्रसंगाचे चित्र असलेल्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. तर मिरवणुकीत सर्वाधिक गर्दी होत असलेल्या लक्ष्मी मार्केट परिसरात विविध राजकीय पक्ष, महापालिका, सामाजिक मंडळांनी स्वागत कक्ष उभारले असून, मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी अकराशेहून अधिक पोलीस, गृहरक्षक दल, राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ध्वनिवर्धक भिंतीचा वापर करू नये, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा प्रशासन व पोलिसांकडून वारंवार देऊनही स्वागत मिरवणुकीसह सातव्या, नवव्या दिवशी मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धकांचा वापर झाला. पोलिसांनी अशा ३७ मंडळांवर कारवाईचा बडगा उगारला असला तरी मंडळाचे कार्यकर्ते अद्याप ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे गुरुवारी झालेल्या नवव्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीवेळी दिसून आले. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांचा गोंगाट सुरूच होता. शुक्रवारी पहाटेपर्यंत मिरजेतील गणेश तलावात विसर्जन प्रक्रिया सुरूच होती.

उद्या अनंत चतुदर्शी दिवशी मिरजेत गणेश तलावात १७५ सार्वजनिक मंडळांच्या श्रींचे विसर्जन होत आहे. यासाठी महापालिकेने उंच गणेश मूर्तीसाठी क्रेनची व्यवस्था केली असून, महापालिकेनेही गणेश तलावाच्या ठिकाणी मदत केंद्र उभारले आहे. तसेच पोलिसांची छावणीही सुरू करण्यात आली असून, या ठिकाणाहून वेळोवेळी नियंत्रण कक्षात माहिती पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मिरजेचे मध्यवर्ती बसस्थानक ते लक्ष्मी मार्केट मार्गे गणेश तलाव हा सुमारे दोन किलोमीटरचा विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असून, या मार्गांवर आठ स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज तरुण मंडळ, विश्वशांती, मनसे, अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवसेना ठाकरे, शिवसेना शिंदे, हिंदू एकता आंदोलन आदी स्वागत कमानी भव्य दिव्य आहेत. मराठा महासंघाच्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार येसाजी कंक निजामाच्या हत्तीशी झुंज देत असल्याचे चित्र आहे, तर हिंदू एकता आंदोलनाच्या कमानीवर रावण आणि मेंढपाळाच्या वेशातील गणेश यांचे चित्र आहे. अहिल्या देवी, महाराणा प्रताप यांची छायाचित्रेही कमानीवर चित्रित करण्यात आली आहेत.

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच उप अधीक्षकांसह ११० हून अधिक अधिकारी, ८२५ अंमलदार, १५० गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाची तुकडी असा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ध्वनीमापन यंत्रासह चार पोलिसांचे एक पथक ध्वनी मोजण्यासाठी स्वतंत्रपणे तैनात करण्यात आले आहेत.