प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : हवा प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा आणि कृष्णा प्रदूषण मुक्तीला प्राधान्य देत तयार करण्यात आलेला प्रशासकीय अर्थसंकल्प गुरुवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्थायी समितीला सादर केला. ६७५ कोटी रुपये खर्चाचा बिगबलून अर्थसंकल्प सादर करीत असताना महसूल वाढीसाठी तेच तेच उपाय सुचविले असून शासकीय अनुदानावरच सर्व डोलारा आहे.

महापालिका प्रशासनाने ६७५.२३ कोटी खर्चाचा आणि ५८ लाख ८६ हजार  रुपये  शिल्लकीचा सुधारित अर्थसंकल्प स्थायी सभापती संदीप आवटी यांना गुरुवारी सादर करण्यात आला. या वेळी उपायुक्त स्मृती पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते. विशेष म्हणजे टॅबलेटमध्ये समाविष्ट असणारा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.  प्रोजेक्टरवर या संपूर्ण अर्थसंकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

अर्थसंकल्पामध्ये महसूल वाढीसाठी प्रशासनाने दरवर्षीचेच विषय मांडले आहेत. प्रभाग समिती १ ते ४ क्षेत्रातील खुल्या जागा, भूखंड, भू भाडे व मनपाच्या इतर जागांमध्ये शुल्कवाढ, उद्यान विभागाकडील कर, शुल्कामध्ये दरवाढ, अग्निशमन आणि आणीबाणी विभागाकडील दरवाढ, पाणीपुरवठा विभागाकडील कर आणि  दरवाढ, आरोग्य विभागाच्या अस्वच्छ भूखंड दंड आणि वार्षकि शुल्कात वाढ तसेच वाणिज्य परवाना  शुल्क वाढ, जाहिरात करामध्ये वाढ,  दैनिक परवाना फी वसुली दरात सुधारणा आणि महापालिकेचे गाळेधारकांना हस्तांतर फीमध्ये व वार्षकि भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. नगररचना विभागाकडील छाननी शुल्क, जमीन विकास रेखांकन, बांधकाम, सुरक्षा अनामत व इतर शुल्क/ करवाढ, स्वच्छता उपयोगकर्ता करावरील उपाययोजनांच्या आधारे महापालिकेच्या उत्पन्नात वार्षकि २५ कोटी रुपयांची अधिक आर्थिक भर पडणार आहे.

मिरज अमृत पाणी योजना, सुवर्णजयंती महाराष्ट्र नाग्रोथान योजना सांगली व मिरज ड्रेनेज योजना प्रस्तावित कुपवाड ड्रेनेज योजना, सुवर्णजयंती महाराष्ट्र नगरोत्थान योजना १०० कोटी, घनकचरा व्यवस्थापन (डीपीआर) अंमलबजावणी, जिल्हा नियोजन योजना – रस्ते विकास व नावीन्यपूर्ण योजना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून काळी खण विकसित करण्याबरोबरच हवा प्रदूषण प्रतिबंध करण्यासाठी कृती आराखडा अंमलबजावणी आणि कृष्णा प्रदूषणमुक्त करण्यासाठीची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

मिरज पंपिंग स्टेशन विकसित करणे, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग समिती १ ते ४ प्रत्येकी १० लाख, मनपा दवाखान्यात अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रतापसिंह उद्यानात पक्षी व प्राणी यांची प्रतिकृती बसवणे, मनपा इमारतीवर सोलर पॅनल बसवणे आदी कामे अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहेत.

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli municipal commissioner nitin kapadnis submitted budget to standing committee
First published on: 28-02-2020 at 03:04 IST