सांगली : गाढव मेले ओझ्याने, शेंगरू मेले हेलपाट्याने अशी पारंपरिक म्हण आहे. गाढव प्राणी केवळ ओझी वाहण्यासाठीच असतो असा समज यामुळे निर्माण झाला. यातून बाहेर पडण्यासाठी आणि गाढवाचे श्रम कमी करण्यासाठी गुरुवारी गाढव दिनाचे औचित्य साधत ॲनिमल राहत संस्थेने वीटभट्टीवरील ३५० हून अधिक गाढवांना श्रममुक्ती प्रदान करत त्यांचा आजीवन सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली.

महाराष्ट्रातील प्राणी हक्क संरक्षण संस्था ॲनिमल राहतला त्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘वीटभट्टी आधुनिकीकरण प्रकल्पा’ मुळे गाढवांचा होणारा त्रास कमी करण्यात यश आले आहे. राज्यातील वीटभट्ट्यांमध्ये पाठीचा कणा मोडेपर्यंत काम करणाऱ्या ३५० हून अधिक गाढवांची सुटका केली आहे. ॲनिमल राहतच्या या उपक्रमामुळे सांगली आणि सोलापूरमधील ३४ वीटभट्ट्या आता पूर्णपणे गाढवमुक्त झाल्या आहेत.

कामगार, भट्टीमालक आणि प्राणी यांच्या आनंदासाठी या कष्टकरी गाढवांच्या जागी ट्रॅक्टरचा वापर सुरू करण्यात आला. त्यामुळे कोणत्याही क्रूरतेचा वापर न करता अधिक उत्पादन घेणे शक्य झाले. नुकत्याच वाचवलेल्या गाढवांमध्ये पाच गाभण गाढव माद्यांचा समावेश आहे, ज्या आता त्यांच्या शिंगरांसोबत ॲनिमल राहतच्या अभयारण्यात शांतता आणि सुरक्षिततेत आपले उर्वरित आयुष्य जगणार आहेत. त्यांना यापुढे कधीही चाबकाचा मार किंवा प्रचंड ओझ्याखाली दबून जाण्याचा त्रास होणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीटभट्टी उद्योगात वापरल्या जाणाऱ्या गाढवांना थकवा, जखमा आणि कुपोषण असूनही सततच्या उष्णतेत कंबरतोड ओझे ओढण्याचा प्रचंड त्रास होतो. तरीही गाढवाच्या वापरामुळे त्यांच्या मालकांना फार कमी पैसे मिळतात, असे ॲनिमल राहतचे वरिष्ठ समुदाय विकास व्यवस्थापक शशिकांत भारद्वाज सांगतात. वीटभट्टीवर कामाला लावलेल्या गाढवांना दुर्लक्ष, गैरवर्तन, घासल्यामुळे झालेले घाव, लंगडेपणा, कुपोषण, सांध्यांना दुखापत, निर्जलीकरण, थकवा आणि रोग यांचा सामना करावा लागतो. कच्च्या विटा त्यांच्या पाठीवर लादून काम करण्यास त्यांना इतके भाग पाडले जाते की, अखेरीस ते आरोग्याच्या तक्रारींमुळे मृत्युमुखी पडतात, असे प्राणिमित्र कौस्तुभ पोळ यांनी सांगितले.