सांगली : काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश पक्षांतर्गत विरोधामुळे रखडला असून, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केला. मात्र, अजूनही ते काँग्रेसमध्ये सक्रिय होण्यास राजी नसल्याचे दिसून येत आहे.
गेले आठ दिवस पाटील हे भाजप प्रवेशाच्या तयारीत होते. यासाठी माजी मंत्री अण्णा डांगे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्तही निश्चित करण्यात आला होता. त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाबाबत चर्चाही केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाटील यांचा भाजप प्रवेश टाळण्यात आला. यामागे पक्षात नव्याने आलेल्या श्रीमती जयश्री पाटील यांचा होत असलेला विरोध हे कारण पुढे येत असून, याबाबत कोणी बोलण्यास राजी नाही.
श्री. पाटील यांनी विधानसभा निवडणूक ताकदीने लढवली. मात्र, श्रीमती पाटील यांची बंडखोरी त्यांच्या पराभवामागील एक कारण मानले जात आहे. तसेच खासदार विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी काँग्रेस संघटनेत त्यांचा होत असलेला हस्तक्षेपही पाटील यांना न रूचणारा आहे. यातून त्यांनी गेल्या दोन महिन्यापासून भाजप प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले होते. यासाठी पक्षातील एक महत्त्वाचे पदाधिकारीही प्रयत्नशील होते. अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समित कदम व शेखर इनामदार यांच्या माध्यमातून श्रीमती पाटील यांचा भाजप प्रवेश घडवून आणून पाटील यांच्या भाजप प्रवेशाला शह दिल्याचे मानले जात आहे.
यानंतरही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्यांनी पुन्हा भाजप प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले होते. हे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले असतानाच त्यांच्या प्रवेशाला पक्षातूनच तीव्र विरोध झाला असून, या विरोधातून महापालिका निवडणुकीवर पक्षाच्या विस्तारीकरणावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, त्यांच्या राजकीय हालचाली लक्षात येताच आ. डॉ. कदम यांनी भेट घेऊन समजूत घालण्याचा आणि पक्षात सक्रिय होण्याचा सल्ला दिला. पक्षांर्गत मतभेदावरही लवकरच उपाय योजला जाईल. मात्र, पक्षाच्या अडचणीच्या काळात एकसंधपणा आवश्यक असल्याचे सांगत त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.