सांगली : महिलेच्या सतर्कतेने अडगळीच्या खोलीत बंदिस्त झालेल्या बिबट्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित बाहेर काढून मंगळवारी सायंकाळी नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. तीन ते चार वर्षांचा हा बिबट्या दुसऱ्या माळ्यावरील खोलीत लपला होता.
माळवाडी (ता. शिराळा) येथील डोंगराच्या बाजूला असलेल्या गोसावी वस्तीवर बाळू आनंदा गोसावी यांचे घर आहे. तळमजल्यावरील खोलीत कुटुंबाचे वास्तव्य आहे. तर दुसऱ्या माळ्यावर अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी वापर करण्यात येतो. सोमवारी सकाळी अश्विनी अरूण गोसावी ही महिला पावसामुळे वरच्या माळ्यावरील खोलीत कपडे सुकविण्यासाठी गेली असता खाटेखाली काही तरी असल्याचा भास झाला. तिने भटके कुत्रे असल्याचा समज करून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला असता खाटेखाली बसलेला बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. यावेळी तिने प्रसंगावधान राखत दार बंद केले आणि आरडाओरडा करत ही घटना अन्य लोकांना सांगितली.
या दुमजली घराच्या दरवाजालगतच प्रसाधनघराचे छत आहे. या छतावरून बिबट्या रविवारी रात्री दुसऱ्या माळ्यावरच्या खुल्या दारातून आत शिरला होता. रात्रभर तो तिथेच असावा, सकाळी महिलेची चाहूल लागताच त्याने आपले अस्तित्व ओरडून जाणवू दिल्याचे दिसून आले. घरात बिबट्या कैद झाल्याची माहिती वन विभागाला मिळताच, वन कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यात बिबट्याला अलगद कैद केले. यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नैसर्गिक अधिवासात रवानगी करण्यात आली.
घरात बिबट्या कैद झाल्याची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. उत्साही गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, सुनील कुरी, स्वाती कोकरे तसेच शिराळा येथील सुशीलकुमार गायकवाड, युनूस मणेर, संतोष कदम, गौरव गायकवाड, विशाल चौगुले, संजय पाटील, सचिन पाटील, राहुल गायकवाड हे साहित्य, पिंजरा आणि व्हॅनसह घटनास्थळी दाखल होत बिबट्याला सुरक्षितपणे कैद करत नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
प्रसंगावधान राखले
अश्विनी गोसावी ही महिला पावसामुळे वरच्या माळ्यावरील खोलीत कपडे सुकविण्यासाठी गेली असता खाटेखाली काही तरी असल्याचा भास झाला. तिने भटके कुत्रे असल्याचा समज करून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला असता खाटेखाली बसलेला बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. यावेळी तिने प्रसंगावधान राखत दार बंद केले आणि आरडाओरडा करत ही घटना अन्य लोकांना सांगितली.