सांगली : पक्ष, चिन्ह याचा विचार न करता निवडणुकीच्या तयारीला लागा, ज्या कार्यकर्त्यांनी गेल्या ३० वर्षांपासून माझे राजकारण उभे केले, अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठीच मी काम करत राहणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा तासगावमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते.

कार्यकर्ते आणि सहकारी यांच्या प्रेमामुळेच विविध पदांवर काम करण्याची संधी मला प्राप्त झाली. या माध्यमातून जिल्ह्यामध्ये भरपूर विकासात्मक कामे करता आली. गेल्या ३० वर्षांपासून नि:स्वार्थीपणे कार्यकर्त्यांनी माझे राजकारण उभे केले. यापूर्वीही कार्यकर्त्यांसाठी मी जास्तीत जास्त वेळ देऊन काम करण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जिवाभावाच्या कार्यकर्त्यांसाठी पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने आणि अधिक तत्परतेने पूर्ण वेळ देऊन काम करण्याची भूमिका राहील. यापुढे कार्यकर्ते हाच माझा पक्ष अशी भूमिका माजी खासदार पाटील यांनी व्यक्त केली.

पाटील म्हणाले, ‘खासदार म्हणून काम करताना टेंभू ताकारी म्हैशाळ योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करता आला. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग जिल्हा व ग्रामीण मार्ग याकरिता हजारो कोटींचा निधी उपलब्ध करता आला, रेल्वे विकास जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधींच्या निधी उपलब्ध करून देऊन सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्यासाठी आहेत. या निवडणुका स्वत: हातात घेऊन कार्यकर्त्यांना यश प्राप्त होण्यासाठी मी अहोरात्र झटणार आहे. यासाठीच संवाद मेळावा आयोजित केला आहे. इथून पुढचे जे माझे काही निर्णय असतील ते फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या हितासाठीचे, कार्यकर्त्यांना विचारात घेऊन असतील, असे ते म्हणाले.

या वेळी बोलताना युवा नेते प्रभाकर पाटील म्हणाले, ‘इथून पुढच्या काळात नेता म्हणून नव्हे, तर तुमचा सहकारी म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची भूमिका असेल. आगामी निवडणुकांकरिता मी उपलब्ध राहणार आहे.’ मेळाव्यासाठी तासगाव-कवठेमहांकाळसह मिरज तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.