सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आणि वसंतदादा पाटील यांची नातसून जयश्री पाटील यांनी काँग्रेसचे तीन माजी महापौर, दोन माजी उपमहापौर आणि आठ माजी नगरसेवक यांच्यासह बुधवारी सायंकाळी मुंबईतील कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रारंभी पालकमंत्री पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले, की सांगलीत विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या श्रीमती पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने याचा फायदा पक्षाला महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत होईल. श्रीमती पाटील यांचा भाजपप्रवेश होण्याचा चमत्कार जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि शेखर इनामदार यांनी घडवून आणला.

प्रवेशानंतर श्रीमती पाटील म्हणाल्या, ‘वसंतदादा, विष्णुअण्णा, मदनभाऊ व प्रकाशबापू पाटील यांनी सामान्य माणसाच्या हिताचे राजकारण केले. तोच विचार पुढे ठेवून यापुढे मी भाजपमध्ये कार्यरत राहीन.

श्रीमती पाटील यांच्यासमवेत काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार, किशोर शहा, श्रीमती कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, प्रशांत पाटील आदींसह माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी नगरसेवक संतोष पाटील, शेवंताताई वाघमारे, मृणाल पाटील, अजित सूर्यवंशी, करण जामदार, प्रकाश मुळके, अजित दोरकर, मदन पाटील युवा मंचाचे अध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आदी उपस्थित होते.