लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामध्ये २९ लाखांच्या संगणक, प्रिंटर आणि यूपीएस खरेदीमध्ये अनियमितता आढळल्याप्रकरणी पर्यवेक्षक व कनिष्ठ सहायक लेखाधिकारी अशा दोघांना निलंबित करण्यात आले असून आणखी काही वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात असल्याची माहिती मिळाली.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामध्ये २९ लाख रुपयांचे ४२ संगणक, प्रिंटर आणि यूपीएस मशीन खरेदी केल्या होत्या. पण, खरेदीची ही प्रक्रिया पूर्णपणे चुकीच्या पध्दतीने राबविल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती. या समितीने चौकशी अहवाल दिल्यानंतर पशुसंवर्धन विभागातील दोन कर्मचारी प्रवीण चव्हाण आणि जैनुद्दीन मुल्ला या दोघांवर गेल्या आठवड्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

आणखी वाचा-सांगली ध्वनिप्रदूषण, लेझरप्रकरणी १४७ मंडळांवर कारवाई

तसेच या विभागातील चार अधिकाऱ्यांना संगणक खरेदीमध्ये झालेल्या कथित अनियमितताप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसा बजावण्यात आलेले अधिकारी वर्ग एकचे असल्याने त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. यानंतर या चार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याचे संकेत मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निलंबित झालेले चव्हाण यांना तासगाव पंचायत समिती, तर मुल्ला यांना कवठेमहांकाळ पंचायत समितीमध्ये उपस्थित राहण्याची सूचना दिली आहे. तसेच उर्वरित अधिकारी वर्ग एकचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा अधिकार राज्य शासनाचा आहे. म्हणून अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.