देशातला भ्रष्टाचार समूळ नष्ट करणार अशी मोदींनी २०१४ पासून गॅरंटी घेतली आहे. आता नव्याने गॅरंटी देत आहेत. मागच्या दीड ते दोन वर्षात देशातले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेतले. भाजपा हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष बनला. तरीही भ्रष्टाचार संपवू हे तुणतुणं मोदी आणि भाजपाचे लोक वाजवत आहेत. हे सगळं खरंतर ढोंग आहे. तरीही आम्ही पंतप्रधानांवर विश्वास ठेवतो. कार्यवाह पंतप्रधान असले तरीही आमचा विश्वास आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
निवडणूक रोखे घोटाळा भयंकर
भारतातला निवडणूक रोखे घोटाळा हा जगातला सर्वात मोठा आणि भयंकर घोटाळा आहे. सरकारचा दबाव, त्यांनी दाखवलेली लालुच, कॉर्पोरेट कंपन्या, ठेकेदार, दारुवाले, औषधं बनवणाऱ्या कंपन्या यांना हजारो कोटींची कामं द्यायची आणि रोखे माध्यमातून पैसे गोळा करायचे आणि आमदार खासदार खरेदी करायचे हा धंदा भाजपाने सुरु केला आहे. कोणत्याही व्यवहारांमध्ये पारदर्शकता नाही असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
बाळराजे चंदा द्या आणि धंदा घ्या असंं काम करत आहेत
कोव्हिड काळात सुरु केलेला पीएम केअर फंडचा काहीही हिशोब नाही. तो खासगी ट्र्स्ट आहे पण तो सरकारी असल्याचं दाखवून कोट्यवधींची रक्कम गोळा करण्यात आली. महाराष्ट्रात अशा प्रकारचा एक घोटाळा झाला आहे. ६०० कोटींचा हा घोटाळा झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून आम्ही माहिती घेत आहोत. वकील नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रितसर माहिती मागितली आणि तक्रार केली. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे व्यवहार, आर्थिक उलाढाल काय आहे? याची माहिती मागवली. व्यवहारांवरुन कोट्यवधींची उलाढाल करत आहेत हे लक्षात आलं. त्यांचा वैद्यकीय मदत रुग्ण कक्ष आहे. गणेश उत्सव स्पर्धेत कोट्यवधी रुपये वाटले, गणपतीत ६०० गाड्या बुक करण्यात आल्या त्याचे पैसे कुणी भरले? कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. सरकारचे बाळराजे (श्रीकांत शिंदे) हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून चंदा दो आणि धंदा लो या माध्यमातून काम करत आहेत. यांचं ऑडिट, देणग्या देणाऱ्यांचा तपशील हे सगळं सातपुते यांनी मागितली आहे. मात्र धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत. त्यांना ही माहिती मिळत नाही असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या खात्यात गेल्या काही वर्षांमध्ये ४० ते ५० लाखांची उलाढाल झाली आहे पण गेल्या दीड वर्षात त्यातली उलाढाल कोट्यवधींची आहे. हे सगळे पैसे कुठून आले, दानशूर कर्णाचे अवतार कोण आहेत हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले आहे. मुख्यमंत्री कार्यालयात बसून बिल्डर्स, कंत्राटदार या सगळ्यांना दिलं जातं आहे. श्रीकांत शिंदेंवर ईडीची कारवाई झाली पाहिजे. हा सगळा पैसा म्हणजे काळा पैसा आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला मिळालेला निधी बेकायदेशीर आहे. असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.